व्यापाऱ्यांची गुन्हे शाखेकडून कसून चौकशी
By Admin | Published: May 27, 2017 12:38 AM2017-05-27T00:38:26+5:302017-05-27T00:41:42+5:30
जालना : नाफेड हमीभाव केंद्रावरील तूर विक्री प्रकरणात संशयित व्यापाऱ्यांचे जबाब नोंदविण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरुवात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नाफेड हमीभाव केंद्रावरील तूर विक्री प्रकरणात संशयित व्यापाऱ्यांचे जबाब नोंदविण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरुवात केली आहे. दोन दिवसांत २१ व्यापाऱ्यांचे जबाब नोंदविण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळे गुन्हे दाखल होण्याच्या भितीने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.
जालन्यातील नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात साडेआठ हजार शेतकऱ्यांनी एक लाख ४२ हजार तीनशे क्विंटल तुरीची विक्री केली आहे. तुरीची आवक वाढल्याने २३ मार्चनंतर प्रती शेतकरी केवळ २५ क्विंटल तूर विक्रीची मर्यादा निश्चित करण्यात आली.
दोन वेळा मुदतवाढ देऊन तुरीची आवक वाढतच गेल्यामुळे नाफेड केंद्राबाहेरील तुरीचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी आदेश दिले.
पंचनाम्यात तुरीच्या तीन हजार पोत्यांचे मालक समोर आले नाहीत. त्यातच तुरीचे अठराशे पोते एकाच रात्रीतून गायब झाल्याने एकूण तूर खरेदीचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडला. त्यामुळे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले. संशयित शेतकरी व व्यापारी अशा तब्बल ८४०० जणांची यादी तयार करण्यात आली आहे. पैकी शंभर क्विंटलपेक्षा अधिक तूर विक्री करणारे ८७९ शेतकरी, व्यापारी गुन्हे शाखेच्या रडारवर आहेत.तसेच ज्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर तूर विक्री करून बँकेत शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालेले पैसे, धनादेश व आरटीजीएसच्या माध्यमातून स्वत:च्या खात्यावर वळती केले, अशांंची कसून चौकशी केली जात आहे. गुरुवारी ११, तर शुक्रवारी दहा व्यापाऱ्यांना थेट मोंढ्यातून चौकशीकरिता गुन्हे शाखेत आणण्यात आल्याचे समजते.
यामध्ये शहरातील काही प्रतिष्ठित व्यापाऱ्यांचाही समावेश आहे. चौकशीसाठी बोलावण्यात आलेल्या व्यापाऱ्यांचे जबाब नोंदविल्यानंतर आवश्यकता वाटल्यास पुन्हा हजर राहण्याच्या अटीवर त्यांना सोडण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तूर विक्री प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावावर तूर विक्री करणे अनेकांना महागात पडण्याची चिन्हे आहेत.