तपास यंत्रणा बोलेना; 'नीट'चा संभ्रम थांबेना ! चाैकशीचा तपशील गाेपनीय ठेवण्याच्या सूचना
By राजकुमार जोंधळे | Published: June 28, 2024 07:39 PM2024-06-28T19:39:39+5:302024-06-28T19:40:43+5:30
नीट गुणवाढीसंदर्भात पालकांकडून अडव्हाॅन्स ५० हजार आणि विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे घेऊन काेट्यवधींची माया जमविण्याचे आराेपींचे नियाेजन हाेते.
लातूर : नीट गुणवाढीसंदर्भात अटकेत असलेला आराेपी मुख्याध्यापक जलीलखाॅ पठाण आणि शिक्षक संजय जाधवची वेगवेगळ्या तपासयंत्रणांकडून सध्याला कसून केली जात आहे. मात्र, या चाैकशीतील तपशील बाहेर येत नसल्याने गत दाेन दिवसांपासून नीट प्रकरणाचा संभ्रम थांबायला तयार नाही. तपास यंत्रणा बाेलेना अन् ‘नीट’चा संभ्रम थांबताना दिसत नाही. दरम्यान, नीट प्रकरणातील चाैकशीचा तपशील गाेपनीय ठेवण्याच्या सक्त सूचना यंत्रणेला आहेत.
नीट गुणवाढीसंदर्भात पालकांकडून अडव्हाॅन्स ५० हजार आणि विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे घेऊन काेट्यवधींची माया जमविण्याचे आराेपींचे नियाेजन हाेते. मात्र, नीटचा निकाल नियाेजित तारखेपूर्वीच जाहीर झाल्याने त्यांचे नियाेजन काेलमडले. ज्यांच्याकडून गुणवाढीच्या कामासाठी रक्कम घेतली हाेती, ती रक्कम परत केल्याची कबुली आराेपी देत आहेत. मात्र, यावर अधिकारवाणीने तपास यंत्रणा काहीच बाेलयाला तयार नसल्याने नीट प्रकरणाचा संभ्रम अन् गुंता वाढत आहे. अटकेत असलेला मुख्याध्यापक पठाण आणि शिक्षक जाधव याची चाैकशी नांदेड येथील एटीएस, लातूर डीवायएसपी पथक आणि स्थानिक पाेलिसांकडून केली जात आहे. तीन दिवसांपासून चाैकशीचा फेऱ्या सुरुच आहे.
नांदेडच्या एटीएस पथकाचा लातुरात दाेन दिवस मुक्काम...
आराेपी संजय जाधव आणि जलील पठाण याच्या चाैकशीसाठी स्वतंत्र पाच यंत्रणा सध्या सक्रिय झाल्या आहेत. या चाैकशीतून काही तरी हाती लागेल का? यासाठी प्रत्येक यंत्रणा काम करत आहेत. यासाठी नांदेड येथील एटीएस पथकाने सलग दुसऱ्या दिवशीही लातुरात मुक्काम ठाेकला.
अटकेतील आराेपींची ‘मॅराेथाॅन’ चाैकशी...
नीट गुणवाढीसंदर्भात अटकेत असलेल्या दाेघा आराेपींची चाैकशी वेगवेळ्या यंत्रणांकडून एकापाठाेपाठ केली जात आहे. या मॅराेथाॅन चाैकशीच्या कचाट्यात अडकलेला मुख्याध्यापक पठाण, शिक्षक जाधव याच्याकडून दरराेज नवनवे खुलासे हाेत असल्याचे समजते. त्यामुळे इतर आराेपींचाही पाेलिस शाेध घेत आहेत.
देगलूरमध्येही तपास पथकाने केली चाैकशी...
नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील मुळचा असलेला आराेपी इरण्णा काेनगलवार याच्या मागावर पथके आहेत. नांदेड, लातूर येथील पथकाने देगलूरला नजीकच्या नातेवाईकांकडे चाैकशी केल्याची माहिती समाेर आली आहे. काही दिवसांपासून इरण्णाचा देगलूरशी फारसा संपर्क नसल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.