दुर्घटनेला निमंत्रण ! कोणत्याही क्षणी महेमूद दरवाजा कोसळू शकतो, तरी नागरिकांची ये-जा सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2021 12:15 PM2021-11-01T12:15:23+5:302021-11-01T12:17:07+5:30
Mehmud Gate: नागरिकांनीच काढले पत्रे; दुचाकी, पादचाऱ्यांचा दरवाज्यातून धोकादायक प्रवास
औरंगाबाद : ऐतिहासिक पाणचक्कीसमोरचा मेहमूद दरवाजा जीर्ण झाला असून, तो कोणत्याही क्षणी कोसळू शकतो. दरवाजापर्यंत नागरिकांना जाता येऊ नये म्हणून महापालिकेने (Aurangabad Municipal Corporation) दोन महिन्यांपूर्वीच लोखंडी पत्रे लावून परिसर सील केला होता. नागरिकांनी सर्व पत्रे काढून टाकले. आता बिनधास्तपणे दुचाकी वाहनधारक, पादचारी दरवाजाच्या आतून ये-जा करीत आहेत. हे दुर्घटनेला निमंत्रण आहे, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.
ऐतिहासिक मेहमूद दरवाजाला मागील वर्षी एका चारचाकी वाहनाने धडक दिली हाेती. त्यामुळे दरवाजाला माेठ्या प्रमाणात तडे गेले हाेते. महापालिकेने सावधगिरी म्हणून दरवाजाच्या आतील भागात लोखंडी अँगल लावले होते. तीन महिन्यांपूर्वी आणखी एका वाहनधारकाने दरवाजाला धडक दिली. यात दरवाजाचा आर्च (स्लॅब) वाकला. दरवाजाचा मध्यभाग कोणत्याही क्षणी कोसळेल अशी स्थिती निर्माण झाली. मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी पाहणी करून स्मार्ट सिटी प्रशासनाला डागडुजीसाठी अंदाजपत्रक, निविदाप्रक्रिया राबविण्याची सूचना केली. मेंटॉर यांनी हा निर्णय सीईओ स्तरावर घेण्याची मुभा दिली. दरम्यान, महापालिकेच्या वॉर्ड अ कार्यालयाने तातडीने दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी सुरू असलेली वाहतूक बंद केली होती. पालिकेने लावलेले सर्व पत्रे नागरिकांनी आता गायब केले आहेत. या धोकादायक दरवाजातून २४ तास दुचाकी वाहनधारक ये-जा करीत आहेत. त्याचप्रमाणे परिसरात राहणारे नागरिकही याच दरवाजातून ये-जा करीत असल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे.
निविदा प्रसिद्ध होणार
स्मार्ट सिटीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दरवाजाच्या डागडुजीसाठी स्वतंत्र निविदा काढण्यात येत आहे. दोन ते तीन दिवसांत ही निविदा प्रसिद्ध होणार आहे. कंत्राटदार ठरल्यानंतर लगेच कामालाही सुरुवात होणार आहे.