अपघातांना निमंत्रण; सोलापूर - धुळे महामार्ग अवघ्या पाच महिन्यांतच उखडला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 02:09 PM2022-05-18T14:09:01+5:302022-05-18T14:21:36+5:30
उद्घाटनानंतर ५ महिन्यांत महामार्गाची दुरवस्था झाल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित होत आहे.
औरंगाबाद : सोलापूर ते औरंगाबाद मार्गे धुळे (एनएच- २११) हा राष्ट्रीय महामार्ग अवघ्या पाच महिन्यांत उखडला आहे. औरंगाबादनजीक असलेल्या कसाबखेडा येथून जाणाऱ्या मार्गावरील डांबर उखडले असून, अपघातांना निमंत्रण मिळते आहे. उद्घाटनानंतर ५ महिन्यांत महामार्गाची दुरवस्था झाल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित होत आहे. २४ एप्रिल २०२२ रोजी औरंगाबाद ते करोडीमार्गे तेलवाडी मार्गाचे लोकार्पण झाले होते.
एल ॲण्ड टी या कंत्राटदार कंपनीने निपाणी ते औरंगाबाद ३० कि.मी.साठी ५०० कोटींतून, तर दिलीप बिल्डकॉन या कंत्राटदार कंपनीने करोडी ते तेलगावपर्यंत ५०० असा सुमारे १ हजार कोटींतून ६० किलोमीटर अंतरात बांधलेला महामार्ग २४ डिसेंबर २०२१ पासून सर्व स्तराच्या वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर पाच महिन्यांतच कसाबखेडा येथे उखडला आहे. देवळाई - सातारा, कांचनवाडी, तीसगाव पुढे करोडी ते कसाबखेडामार्गे तेलवाडीपर्यंत हा महामार्ग जातो. २१ डिसेंबर रोजी पूर्णत्व प्रमाणपत्र मिळाल्यानंतर टोलचा दर निश्चित करण्यात आला आहे. १० ठिकाणी सर्व्हिस रोड आहे. १० अंडरपास आहेत. ८ पादचारी मार्ग, जनावरांसाठी २ मार्ग, ४ जंक्शन्स या अंतरात आहेत. काही उड्डाणपूलदेखील आहेत.
तातडीने दुरुस्ती करू
औरंगाबाद ते करोडी हे काम एल ॲण्ड टी तर पुढील काम दिलीप बिल्डकॉन या कंत्राटदार कंपनीने केल्याचे एनएचएआयचे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी सांगितले. कसाबखेडा येथील सर्व्हिस रोड उखडला आहे का मुख्य मार्ग, याची पाहणी केली जाईल. तसेच उखडलेला भाग तातडीने दुरुस्त केला जाईल, असेही सांगितले.
औरंगाबादपासून असा आहे महामार्ग
लांबी : ६० कि. मी.
योजना : भारतमाला
निधी कशातून? : ईपीसी
कंत्राटदार कंपनी : एल ॲण्ड टी, दिलीप बिल्डकॉन
अभियंता संस्था : सातारा इन्फ्रा, कन्सल्टिंग इंजि., सुगम टेक्नो.
प्रकल्प खर्च : अंदाजे १ हजार कोटी
बांधकाम कालावधी : ९१० दिवस
कंत्राट कालावधी : अडीच वर्षे
काम सुरू झाले : जानेवारी २०१८
काम संपले : डिसेंबर २०२१
वाहनांना एकदा जाताना लागतो टोल
कार, जीप - ६० रुपये
एलएमव्ही, मिनी बस - ९५ रुपये
बस, ट्रक - १९५ रुपये
व्यावसायिक वाहन - २१५ रुपये
एचसीएम वाहन - ३०५ रुपये
ओव्हरसाईज वाहन - ३७० रुपये