धोंदलगाव-राहेगाव रस्त्याच्या कामात बालमजुरांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:02 AM2021-01-14T04:02:56+5:302021-01-14T04:02:56+5:30
वैजापूर : घरची परिस्थिती हलाखीची व काही प्रमाणात तितक्याच जबाबदाऱ्या असणाऱ्या समाज व्यवस्थेमुळे बालमजूर विविध ठिकाणी काम करताना ...
वैजापूर : घरची परिस्थिती हलाखीची व काही प्रमाणात तितक्याच जबाबदाऱ्या असणाऱ्या समाज व्यवस्थेमुळे बालमजूर विविध ठिकाणी काम करताना दिसतात. बालमजुरीचे उच्चाटन करण्यासाठी शासन स्तरावरून मोठे प्रयत्न होत आहेत, परंतु बालमजूर कमी होण्याऐवजी ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
तालुक्यातील धोंदलगाव-राहेगाव रस्त्याच्या ठेकेदाराने बालमजुरांनाच कामावर घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साधारणतः बारा दिवसांपासून सुरू असलेल्या या कामावर १० बालमजूर काम करीत असून देखील सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष जाले आहे. त्यामुळे शासनाच्या उद्देशालाच ठेकेदारासह संबंधित अधिकाऱ्यांकडून हरताळ फासला जात आहे.
बालमजुरांना पायबंद घालण्यासाठी शासन स्तरावरून मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे. लहान मुले म्हणजे देशाचे भविष्य परंतु उद्याचे हे भविष्य रस्त्यावर मुरुम टाकताना दिसत आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या वतीने विशेष दुरुस्तींतर्गत धोंदलगाव-राहेगाव या सहा किलोमीटर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम हाती घेतले आहे. साधारणत: बारा दिवसांपासून हे काम सुरू आहेे. एक कोटी २५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. सध्या रस्त्याचे खडीकरण करून डांबरीकरण करण्यात येत आहे. रस्त्याच्या कामासाठी जवळपास ५० मजूर आहेत. संबंधित ठेकेदाराने यापैकी कामावर चक्क १० पेक्षा जास्त बालकामगार आणल्याचे समोर आले आहे.
-----------
निकृष्ट दर्जाची खडी
धोंदलगाव-राहेगाव रस्त्याच्या कामासाठी बालमजूर काम करीत आहेत. त्यात आणखी बाब म्हणजे या रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाची खडी वापरण्यात आली. यंत्राने खडीची दवाई थातूरमातूर केली आहे. डांबराचा अल्प प्रमाणात वापर करण्यात आला. परिणामी डांबरीकरण पुन्हा उखडून चालले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
------------
धोंदलगाव - राहेगाव रस्त्याच्या कामावर बालमजूर काम करीत नाहीत. या कामावर एकही बालमजूर नाही. असे असल्यास चौकशी करून सांगतो सध्याचे काम चालू आहे. ते अंदाजपत्रकानुसार चालू आहे.
- एस. बी. काकड, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, वैजापूर.
फोटो कॅप्शन : धोंदलगाव-वैजापूर रस्त्याच्या कामावर निकृष्ट दर्जाची खडी टाकून रस्त्याचे काम होत आहे.