5 नक्षलवाद्यांचा खात्मा करणाऱ्या IPS मनिष कलवानियांना दुसऱ्यांदा शौर्य पदक जाहीर
By राम शिनगारे | Published: January 25, 2023 09:24 PM2023-01-25T21:24:24+5:302023-01-25T21:24:38+5:30
सहा महिन्यांत दुसऱ्यांदा सन्मान : एका नक्षल्यास जिवंतही पकडले
औरंगाबाद : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात सी-६० कमांडो पथकाने औरंगाबाद ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या नेतृत्वात नक्षल्यांसोबत आठ तास चाललेल्या भीषण चकमकीत ५ नक्षल्यांचा खात्मा केला. त्यातील एकास जिवंत पकडले. या कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपतींचे शौर्यपदक बुधवारी जाहीर झाले. सहा महिन्यांच्या कालावधीत त्यांना दुसऱ्यांदा हा सन्मान प्राप्त झाला आहे.
पोलिस अधीक्षक कलवानिया यांनी सप्टेंबर २०१९ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात अप्पर पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत होते. २९ मार्च २०२१ रोजी उत्तर गडचिरोलीतील खोबरामेंढा घनदाट जंगलात सर्च ऑपरेशन राबविताना दबा धरून बसलेल्या ८० ते ९० नक्षलवाद्यांनी पहाटे अंधारात पथकांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. तेव्हा पथकाचे नेतृत्व कलवानिया करीत होते. नक्षल्यांना प्रत्युत्तरात पथकाने जोरदार फायरिंग सुरू केली. पोलिसांचा वाढता दबाब पाहून दुपारी १ वाजेच्या सुमारास नक्षली तेथून पळून गेले. ८ ते ९ तास चाललेल्या चकमकीत ५ नक्षल्यांना ठार केले, तर एकास जिवंत पकडले. या कारवाईत कुख्यात नक्षली कंमाडरला टिपण्यात यश मिळाले. पळून गेलेल्या नक्षल्यांचे शस्त्र, दारूगोळा, बॉम्ब, स्फोटकांसह इतर साहित्य मोठ्या प्रमाणात मिळून आले.
या कारवाईत कलवानिया यांच्यासह तीन कमांडो जखमी झाले होते. जखमी असतानाही कलवानिया यांनी सहकाऱ्यांचे मनोबल उंचावत ८० किलोमीटर आत जंगलामध्ये तीन दिवस सर्च ऑपरेशन राबविले. या साहसी व नक्षली चळवळीला हादरा देणाऱ्या कामगिरीसाठी कलवानिया यांना राष्ट्रपती यांचे शौर्यपदक जाहीर झाले. त्याशिवाय गडचिरोलीसारख्या नक्षल प्रभावित दुर्गम क्षेत्रात दोन वर्षे अत्युत्कृष्ट सेवा बजावल्यामुळे त्यांना केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयाकडून ‘आंतरिक सुरक्षा पदका’ने सन्मानित केले आहे.
या कारवाईत मिळाले पहिले पदक
अधीक्षक कलवानिया यांना १४ ऑगस्ट २०२२ रोजी राष्ट्रपतींचे पहिले शौर्यपदक मिळाले आहे. १८ ऑक्टोबर २०२० रोजी किसनेली गावाजवळील घनदाट जंगलात नक्षलीच्या टिपागड, कोरची दलम आणि प्लाटून १५ मधील ५ जहाल नक्षलींचा खात्मा केला होता. या कामगिरीसाठी शौर्यपदकाने सन्मानित केले होते. यानंतर दुसऱ्या कामगिरीसाठी शौर्यपदक जाहीर झाले आहे.
सहायक उपनिरीक्षक वाघ यांना राष्ट्रपती पदक जाहीर
औरंगाबाद शहर आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक गोकुळ पुंजाजी वाघ यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. गोकुळ वाघ हे १४ ऑक्टोबर १९९० साली शहर पोलिस दलात पोलिस शिपाई म्हणून भरती झाले होते. त्यांनी पोलिस मुख्यालय, गुन्हे शाखा, एमआयडीसी सिडको, एमआयडीसी वाळूज, आर्थिक गुन्हे शाखा आदी ठिकाणी सेवा बजावली आहे. त्यांच्या ३२ वर्षे सेवा काळात उत्कृष्ट कामगिरीबद्दल ४२१ बक्षिसे व ८ प्रशंसापत्रे मिळालेली आहेत. त्यांना २०१७ मध्ये पोलिस महासंचालक पदक प्राप्त असून, त्यांना गुणवत्तापूर्वक सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलिस पदक जाहीर झाले आहे.
जयदत्त भवर यांना अंतरिक सुरक्षा पदक
गडचिरोलीसारख्या नक्षल प्रभावित व दुर्गम क्षेत्रात दोन वर्षे अतिउत्कृष्ट सेवा बजावल्यामुळे उपविभागीय अधिकारी जयदत्त बबन भवर यांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अंतरिक सुरक्षा पदक जाहीर झाले आहे. भवर यांनी गडचिरोली जिल्ह्यातील कुरुखेरा उपविभागात सेवा बजावली आहे. याबद्दल त्यांचे अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर अधीक्षक सुनील लांजेवार यांनी अभिनंदन केले.