बारापुल्ला गेटच्या बाजूला लावलेली लोखंडी ग्रील रस्त्यावर कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:05 AM2021-06-09T04:05:21+5:302021-06-09T04:05:21+5:30
औरंगाबाद : ऐतिहासिक बारापुल्ला गेटच्या बाजूला महापालिकेने चार महिन्यांपूर्वीच लोखंडी ग्रील बसविली होती. खाम नदीपात्रात नागरिकांनी कचरा टाकू नये ...
औरंगाबाद : ऐतिहासिक बारापुल्ला गेटच्या बाजूला महापालिकेने चार महिन्यांपूर्वीच लोखंडी ग्रील बसविली होती. खाम नदीपात्रात नागरिकांनी कचरा टाकू नये म्हणून बसविण्यात आलेली ही ग्रील सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अचानक रस्त्यावर कोसळली. ग्रील कोसळली तेव्हा रस्त्यावर कोणीही नव्हते. महापालिकेच्या उद्यान विभागाने त्वरित डागडुजीचे काम सुरू केले.
शहरातील सर्वच पुलांच्या खाली नाल्यात आणि खाम नदीपात्रात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येतो. नागरिकांनी नाल्यात किंवा नदीपात्रात कचराच टाकू नयेत म्हणून मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी लॉकडाऊनमध्ये सर्वच नाल्यांवर लोखंडी ग्रील बसविण्याचे आदेश दिले. महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत अत्यंत कमी दरात या कामाला सुरुवात करण्यात आली. काही ठिकाणी महापालिकेकडे पडलेल्या जुन्या साहित्याचा वापर करण्यात आला. मोंढा, बारुदगर नाला, गरमपाणी, बारापुल्ला गेट आदी ठिकाणी लोखंडी ग्रील दोन्ही बाजूने बसविण्यात आली. ग्रील बसविल्यानंतर पात्रात आणि नाल्यांमध्ये कचरा येण्याचे प्रमाण बरेच कमी झाले. सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अचानक बारापुल्ला गेटवरील लोखंडी ग्रील रस्त्यावर कोसळली. सुदैवाने रस्त्यावर ये-जा करणारे कोणीही नव्हते. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी त्वरित महापालिकेला दिली. सहायक आयुक्त नंदकिशोर भोंबे यांनी त्वरीत घटनास्थळ गाठून पाहणी केली. उद्यान अधीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित दुरुस्तीचे काम कनिष्ठ अभियंता चांडक यांनी सुरू केले.
पुलाच्या जुन्या फाउंडेशनने केला घात
बारापुल्ला गेटला लागून असलेल्या ४०० चारशे वर्षे जुन्या पुलाच्या फाउंडेशनचा आधार ग्रिल उभारण्यासाठी घेतला होता. जुने फाउंडेशन पडल्यामुळे ग्रील कोसळल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले. दोन दिवसांत पुन्हा ग्रील उभी करण्यात येईल. याशिवाय शहरात ज्या ठिकाणी ग्रील उभारण्यात आल्या आहेत, त्याची पुन्हा एकदा तपासणी करण्यात येणार आहे.