चोरीचे ट्रक, कार विक्री प्रकरणात चेसिस नंबर बदलण्यासाठी वापरले लोखंडी ठसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 06:09 PM2018-05-10T18:09:48+5:302018-05-10T18:11:12+5:30
गुन्हे शाखेने नगरसेवकाच्या भावासह चार जणांकडून वाहनांचे चेसिस आणि इंजिन नंबर बदलण्यासाठी वापरलेले एबीसीडीचे २६ आणि ० ते ९ चे आकडे असलेले लोखंडी ठसे जप्त केले आहेत.
औरंगाबाद : भाड्याने घेतलेल्या हायवा ट्रकचे रंग आणि चेसिस नंबर बदलून परस्पर विक्री करणाऱ्या राज्यव्यापी रॅकेटचा मुख्य सूत्रधार धुळे येथील जावेद मणियार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, गुन्हे शाखेने नगरसेवकाच्या भावासह चार जणांकडून वाहनांचे चेसिस आणि इंजिन नंबर बदलण्यासाठी वापरलेले एबीसीडीचे २६ आणि ० ते ९ चे आकडे असलेले लोखंडी ठसे जप्त केले आहेत.
गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यातील विविध ठिकाणांहून चोरलेल्या हायवा आणि अन्य वाहनांचे रंग, चेसिस आणि इंजिन नंबर बदलून त्या वाहनाची बनावट कागदपत्रे तयार करून वाहने विक्री करणाऱ्या राज्यव्यापी टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी भिवंडी पोलिसांनी औरंगाबादेतील एमआयएमचा नगरसेवक शेख जफर यास अटक केली आहे, तर जफरचा भाऊ शेख बाबरसह चार जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. फसवणुकीच्या गुन्ह्यात नगरसेवक जफरचा भाऊ शेख बाबर पोलीस कोठडीत आहे. चौकशीदरम्यान बाबरने गुन्ह्याची कबुली देत सुमारे दीड वर्षापासून त्यांनी हा गोरखधंदा सुरू केल्याचे सांगितले.
बाबरचे चिकलठाणा येथे टाटा मोटार गॅरेज आहे. या गॅरेजवर आरोपी जावेद मणियार हा चोरीची वाहने आणून देत असे. त्यानंतर बाबरचे लोक वाहनांचा रंग बदलत. शिवाय वाहनांवरील मूळ चेसिस आणि इंजिन नंबर कटरने खोडून टाकत आणि नवीन नंबर टाकले जात असत. नवे इंजिन आणि चेसिस नंबर जुन्या क्रमांकासारखेच हुबेहूब दिसावेत, यासाठी त्यांनी क्रमांक टाकण्यासाठी विशिष्ट असे लोखंडी ठसे (क्रमांक आणि एबीसीडी) तयार करून आणले होते. हे ठसे, कटर आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले.
जावेद मणियार मुख्य सूत्रधार
पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार धुळे येथील जावेद मणियार आहे. शिवाय गुरुप्रीतसिंग हा देखील पोलिसांना वाँटेड आहे. जावेद मणियार हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्यास जळगाव, धुळे आणि गुजरात पोेलिसांनीही अटक केली होती.