टीएचआर आहाराचे अनियमित वाटप
By Admin | Published: June 20, 2017 12:01 AM2017-06-20T00:01:08+5:302017-06-20T00:06:43+5:30
औरंगाबाद अंगणवाड्यांच्या माध्यमातून ६ महिने ते ६ वर्षांची बालके, स्तनदा माता आणि गरोदर महिला यांना टीएचआर पोषण आहाराचे नियमितपणे वाटप करण्यात येत असते
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : बालमृत्यू, कुपोषण, मातामृत्यू या समस्यांवर मात करण्यासाठी एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत चालविण्यात येणाऱ्या अंगणवाड्यांच्या माध्यमातून ६ महिने ते ६ वर्षांची बालके, स्तनदा माता आणि गरोदर महिला यांना टीएचआर पोषण आहाराचे नियमितपणे वाटप करण्यात येत असते. मात्र, शहरातील काही अंगणवाड्यांमध्ये मागील दोन महिन्यांपासून हा आहार अत्यंत अनियमित व अपुरा येत असल्याने बालकांचे व मातांचे पोषण होणार कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत शहरात अनेक अंगणवाड्या चालविण्यात येतात. या अंगणवाड्यांच्या माध्यमातून परिसरातील ६ वर्षांखालील मुले, स्तनदा माता व गरोदर मातांना महिन्यातून एकदा एका ठराविक दिवशी टीएचआर (टेक होम रेशन) म्हणजेच घरी जाऊन शिजवून खाण्याच्या आहाराचे वाटप करण्यात येते. मात्र, मागील दोन महिन्यांपासून शहरातील अनेक अंगणवाड्यांमध्ये या आहाराचे वाटप झालेले नसल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली.
बहुतांश अंगणवाड्यांमध्ये एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात टीएचआर आहाराचे वाटप करण्यात आले होते. त्यानंतर मे महिन्यात अंगणवाडी सेविकांकडून वारंवार मागणी करूनही आहार आला नाही. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अनेक अंगणवाड्यांमध्ये आहाराचे वाटप झाले. मात्र, तो आहार अत्यंत कमी होता. यामध्ये एका लाभार्थ्याला चार वेगवेगळ्या पदार्थांच्या पाकिटांचे वाटप होणे अपेक्षित आहे. मात्र, आहार अत्यंत कमी प्रमाणात आल्याने एका लाभार्थ्याला केवळ दोन पाकिटे देण्यात आली. याविषयी अधिक विचारले असता टीएचआर आहार मुळातच अत्यंत कमी प्रमाणात येत असल्याने तुटवडा निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.