तंटामुक्त समितीच्या पुरस्कार खर्चात अनियमितता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:05 AM2021-07-20T04:05:31+5:302021-07-20T04:05:31+5:30
खुलताबाद : तालुक्यातील येसगाव येथील महात्मा गांधी तंटामुक्त ग्रामसमितीला मिळालेल्या तीन लाख रुपये बक्षिसाची रक्कम तंटामुक्त गाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ...
खुलताबाद : तालुक्यातील येसगाव येथील महात्मा गांधी तंटामुक्त ग्रामसमितीला मिळालेल्या तीन लाख रुपये बक्षिसाची रक्कम तंटामुक्त गाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत:च्या नावे धनादेश काढून अनियमितता केल्याचे लेखापरीक्षण अहवालात उघड झाले आहे. संबंधितांवर कारवाई करून रक्कम वसूल करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
येसगाव येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीला उत्कृष्ट कामगिरीबद्दल २०१२-१३ मध्ये तीन लाख रुपये बक्षीस मिळाले होते. या बक्षिसाची रक्कम व्याजासहित ३.११ लाख झाली. समितीच्या अध्यक्ष व सचिवाने २०१६-१७ मध्ये तंटामुक्ती पुरस्कार रकमेतून झालेल्या खर्चात अनियमितता केल्याची तक्रार ज्ञानेश्वर खंडू खंडागळे यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांकडे केली होती. त्या अनुषंगाने सहायक लेखापरीक्षा अधिकारी औरंगाबाद यांनी परीक्षण केले. शासन निर्णयानुसार पुरस्कार रकमेतून खर्च करण्याबाबतचे अधिकार ग्रामसभेला आहेत. तीन लाख ११ हजार खर्च करण्यापूर्वी व नंतरही ग्रामसभेने या खर्चास मंजुरी दिल्याचे दिसून आले नाही. हा खर्च नियमबाह्य ठरतो. असे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर होणाऱ्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
---
पोलीस निरीक्षकांकडे तक्रार
खुलताबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी सोमवारी (दि.१९) खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांना येसगाव येथील तंटामुक्त गाव समितीला मिळालेला पुरस्कार रकमेचा गैरवापर तसेच अनियमितता बाबतची तक्रार व ऑडिट करण्यासंदर्भात पत्र दिले आहे.