कोट्यवधींची अनियमितता भोवणार; 'वाल्मी'च्या माजी महासंचालकांसह तिघांना ‘कारणे दाखवा’
By बापू सोळुंके | Updated: February 7, 2025 12:46 IST2025-02-07T12:45:33+5:302025-02-07T12:46:12+5:30
पैठण रोडवरील जल व भूमी व्यवस्थापन संस्थेच्यावतीने पीक व पाणी व्यवस्थापन, पाणीवापराचे तंत्र याविषयी शेतकरी आणि विविध स्वयंसेवी संस्थांना प्रशिक्षण देण्यात येते.

कोट्यवधींची अनियमितता भोवणार; 'वाल्मी'च्या माजी महासंचालकांसह तिघांना ‘कारणे दाखवा’
छत्रपती संभाजीनगर : जल आणि भूमी व्यवस्थापन संस्थेतील (वाल्मी) अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांची आर्थिक आणि प्रशासकीय अनियमितता केल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले. या पार्श्वभूमीवर शासनाने वाल्मीचे माजी महासंचालक व्ही. बी. नाथ, तत्कालीन प्रशासकीय अधिकारी लब्बा आणि लेखाधिकारी सरला देशमुख यांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावल्या आहेत.
पैठण रोडवरील जल व भूमी व्यवस्थापन संस्थेच्यावतीने पीक व पाणी व्यवस्थापन, पाणीवापराचे तंत्र याविषयी शेतकरी आणि विविध स्वयंसेवी संस्थांना प्रशिक्षण देण्यात येते. जलसंपदा, जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनाही येथे नियमित प्रशिक्षण देण्यात येते. यासाठी संस्थेत प्राचार्य आणि प्राध्यापक कार्यरत आहेत. जलसंधारण विभागांतर्गत या स्वायत्त संस्थेचा कारभार महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चालविण्यात येतो.
‘वाल्मी’चे तत्कालीन महासंचालक नाथ, प्रशासकीय अधिकारी आणि लेखाधिकारी यांनी निविदा प्रक्रिया न राबविता सभागृह व सांस्कृतिक भवन नूतनीकरण, सिमेंट नाला योग्य ठिकाणी न बांधणे आणि कॅशबुक, लेखापुस्तिकेत नोंदी न करणे आदी तक्रारी शासनास प्राप्त झाल्या होत्या.
शासनाच्या आदेशाने ‘वाल्मी’चे आयुक्त तथा प्रभारी महासंचालक प्रकाश खपले यांनी प्राथमिक चौकशी केली. या चौकशीत नाथ, लब्बा आणि सरला देशमुख यांनी आर्थिक आणि प्रशासकीय अनियमितता केल्याचे आढळल्याचे सूत्रांनी सांगितले. हा अहवाल सादर केल्यानंतर शासनाने या नोटिसा बजावल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्राथमिक चौकशीत काय आढळले?
शासनाची पूर्वपरवानगी न घेताच संस्थेच्या १० कोटींच्या दीर्घ मुदत ठेवी मोडून रक्कम ठेकेदाराला अदा केली. संस्थेच्या महसुली जमा खात्यातील २ कोटी रुपयेही नियमित खर्चाच्या खात्यात वर्ग केले. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा ३ कोटी १ लाख रुपयांचा निधीही नियमित खर्चासाठी वापरला.
लब्बा यांची बीड येथे बदली झाल्यानंतर पदमुक्त करण्यात आल्यानंतर तेथे रुजू न होता सुटीच्या दिवशी ‘वाल्मी’मध्ये येऊन आर्थिक, देवाण-घेवाण करीत असल्याचे दिसून आले होते. लेखाधिकारी देशमुख यांनी परवानगी नसताना ‘वाल्मी’चे वाहन वापरल्याचे आणि याबाबतच्या अनधिकृत नोंदी घेतल्याचे दिसून आले.
मंत्री राठोड यांनी दिले होते कार्यवाहीचे आश्वासन
मागील महिन्यात जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी ‘वाल्मी’त बैठक घेतली, तेव्हा अनेकांनी या तक्रारींचा पाढा त्यांच्यासमोर वाचला. तेव्हा त्यांनी संबंधितांवर योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. आता नोटिसानंतर या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
................