मोठा दिलासा! पूर्णा नदीपात्रातील ७ बॅरेजेसमुळे सिंचन क्षेत्र वाढणार; सत्तारांनी चालत जात केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2022 07:28 PM2022-02-12T19:28:15+5:302022-02-12T19:29:37+5:30
बॅरेजेसचे काम पूर्ण झाल्यानंतर जवळपास ३३ किलोमीटरपर्यंत पाणी अडवून यातून ५४ टक्के सिंचन क्षेत्रात वाढ
सिल्लोड : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रात ७ नवीन बॅरेजेस बांधण्याच्या कामाचे आज अंतिम सर्वेक्षण करण्यात आले. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकारी व पदाधिकाऱ्यांसोबत भवन ते केऱ्हाळा खोडकाईवाडी असे जवळपास ६ किलोमीटर नदीपात्रात पायी चालत बॅरेजेसच्या नियोजीत जागेची पाहणी केली.
सिल्लोड ते कन्नड हद्दीपर्यंत पूर्णा नदीच्या पात्रात एकूण ७ बॅरेजेस उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून मार्च अखेर बॅरेजेस उभारण्यासाठीचे सर्व प्रशासकीय कारवाई पूर्ण होवून येत्या एप्रिल महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. सदरील बॅरेजेसचे काम पूर्ण झाल्यानंतर जवळपास ३३ किलोमीटर पर्यंत पाणी अडवून यातून ५४ टक्के सिंचन क्षेत्रात वाढ होईल. यामुळे निश्चितपणे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मदत होईल असा विश्वास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.
अजिंठा खोऱ्यात पाणी अडविण्यासाठी जमीन संपादित करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे अजिंठा खोऱ्यात तातडीने सर्वेक्षण करणे, अजिंठा येथील निजाम कालीन बंधाऱ्यांची देखभाल व दुरुस्ती करणे तसेच अजिंठ्याच्या खोऱ्यात अधिक सिंचन व्यवस्था निर्माण करण्यासाठी सर्वेक्षण कामाला सुरुवात करने ,सिद्धेश्वर खोऱ्यात पाणी साठवण व नियोजन करणे, शिवना ते अजिंठा गावाच्या रस्त्याने नवीन पाझर तलावासाठी सर्वेक्षण करणे, जुई नदीचे पाणी वाहून जाते सदरील पाणी अजिंठा - अंधारी प्रकल्पात वळविण्यासाठी उपाययोजना करणे,खेळणा मध्यम प्रकल्पाची जल साठवण क्षमता वाढीसाठी धरणाची उंची वाढविण्यासंदर्भात सर्व निकष व नियमांच्या अधिनराहून उपायोजना करन्याचे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी उपविभागीय अधिकारी संजीव मोरे, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, तहसीलदार विक्रम राजपूत,प.स. सभापती डॉ. संजय जामकर, गटविकास अधिकारी अशोक दांडगे, नरेंद्र पाटील, संचालक शेख आमेर अब्दुल सत्तार, शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे,राजेंद्र ठोंबरे, मारुती वराडे,माजी जि.प.अध्यक्ष श्रीराम महाजन हजर होते.