ब्रह्मगव्हाण योजनेत भ्रष्टाचाराचे 'सिंचन' ; मंत्र्याच्या नातेवाईकासाठी ‘नसती’ उठाठेव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 04:38 PM2020-10-31T16:38:18+5:302020-10-31T16:46:12+5:30

दोन कोटी रुपयांचा दंड माफ करण्याच्या हालचाली

'Irrigation' of corruption in Paithan's Brahmagavan scheme; Raise the non issues for the minister's relatives | ब्रह्मगव्हाण योजनेत भ्रष्टाचाराचे 'सिंचन' ; मंत्र्याच्या नातेवाईकासाठी ‘नसती’ उठाठेव

ब्रह्मगव्हाण योजनेत भ्रष्टाचाराचे 'सिंचन' ; मंत्र्याच्या नातेवाईकासाठी ‘नसती’ उठाठेव

googlenewsNext
ठळक मुद्देयोजनेचे २०१७ पासून काम ठप्पनिविदा न काढताच लावले धोरण

- विकास राऊत 

औरंगाबाद : पैठण तालुक्यातील ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन या महत्त्वाकांक्षी योजनेत भ्रष्टाचार करण्याची अनेक धुरिणांची ‘महत्त्वाकांक्षा’ फळाला येत असून, यामध्ये शासनाला मोठ्या प्रमाणात गंडविण्याचा प्रकार सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. 

२०१० मध्ये योजनेच्या टप्पा क्रमांक २ चे काम रेंगाळत ठेवल्याप्रकरणी अंबरवाडीकर अ‍ॅण्ड कंपनीला लावलेला सुमारे सव्वादोन कोटी रुपयांचा दंड माफ करण्याच्या हालचालींना वरिष्ठ पातळीवर वेग आला आहे. जिल्ह्यातील शिवसेनेच्या एका मंत्र्याच्या नातेवाईकासाठी ही उठाठेव असून, योजनेचे कंत्राट नातेवाईकाला सबलेट करून घेण्यात आले आहे. त्या मोबदल्यात दंड माफ करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. शासनाचा दंड न भरताच ऑगस्ट महिन्यात अंबरवाडीकर अ‍ॅण्ड कंपनी, रवीकिरण कन्स्ट्रक्शनकडे असलेले योजनेचे काम स्वप्नील गोरे यांच्या साहस इंजिनिअर्स अ‍ॅण्ड कॉन्ट्रॅक्टर्स प्रा.लि.कडे सबलेट केले आहे.

या योजनेचे मूळ कंत्राट रद्द करण्यासाठी राजकीय, बिगर राजकीय संघटनांकडून अनेक मागण्या झाल्या. त्यानुसार लघु पाटबंधारे क्रमांक १ च्या तत्कालीन अभियंत्यांनीदेखील शहानिशा करून चौकशी अहवाल तयार केला. २०१० साली अंबरवाडीकर अ‍ॅण्ड कंपनीला योजनेचे ५५ कोटींमध्ये काम देण्यात आले. २० टक्के अधिक दराने हे काम दिले होते. वाढीव किमतीनुसार सध्या हे काम ११० कोटींच्या आसपास गेले आहे. यातील १८ कोटींची रक्कम अंबरवाडीकर अ‍ॅण्ड कंपनीला अदा केली आहे. २०११ साली किरण वाडी यांच्या रवीकिरण कन्स्ट्रक्शन्सला ३० टक्के रकमेत हे कंत्राट सबलेट करण्यात आले. त्यानंतर ऑगस्ट २०२० मध्ये याच योजनेतील काम स्वप्नील गोरे (शिवसेनामंत्र्यांचे नातेवाईक) यांच्या साहस इंजिनिअर्स या कंपनीला २९ टक्के रकमेत सबलेट केले.

दरम्यान,  २०१७ पासून योजनेचे काम ठप्प पडल्याने दररोल २५ हजारांचा दंड अंबरवाडीकर कन्स्ट्रक्शन्सला लावला आहे. त्याची रक्कम सव्वादोन कोटी वसूल करावी, तसेच सध्याच्या डीएसआर (डिस्ट्रिक्ट शेड्युल्ड रेट)प्रमाणे वाढीव २ कोटींचा दर अंबरवाडीकर अ‍ॅण्ड कंपनीला निविदेनुसार अदा न करण्याबाबत जलसंपदातील कार्यकारी, अधीक्षक अभियंत्यांनी वारंवार रेकॉर्डनिहाय वरिष्ठांना दिलेल्या पत्रात नमूद केलेले आहे. 

कार्यकारी अभियंत्यांची माहिती अशी
योजनेचे कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे यांनी सांगितले की, योजना खूप मोठी आहे. त्यातील ही एक निविदा आहे. कंत्राट सबलेट करण्यात आले आहे. राहिली गोष्ट अंबरवाडीकर कन्स्ट्रक्शन्सकडून दंड वसूल करण्याबाबत, तर यात मुख्य अभियंता स्तरावर चौकशी समिती नेमण्याचा निर्णय होत आहे. समितीच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही होईल. 

फेब्रुवारी २०२० मध्ये दिले होते पत्र 
योजनेतील १२ प्रकारची कामे पूर्ण करून देण्याबाबत अंबरवाडीकर कन्स्ट्रक्शन्सला कार्यकारी अभियंता पातळीवर पत्र देण्यात आले होते. सदरील कामे तातडीने पूर्ण केली नाहीत, तर निविदा रद्द करण्याचा इशारा पत्रातून देण्यात आला होता; परंतु राजकीय दबाव आणल्याने कंत्राटदार कंपनीने रेंगाळलेली कामे तशीच ठेवली. 

१3 ऑक्टोबर रोजी झाली बैठक
ब्रह्मगव्हाण योजनेतील कालवा क्र. १ आणि २ ची कामे अपूर्ण असल्यामुळे १3 ऑक्टोबर रोजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासोबत विस्तारित मंत्रालय ६०७ क्रमांकाच्या दालनात बैठक झाली. ७०२ कोटी रुपये योजनेची सुधारित किंमत आहे. दोन टप्प्यांत १८ हजार ७८७ हेक्टर सिंचन क्षमता यातून आहे. बैठकीला रोहयोमंत्री संदीपान भुमरे, अभियंते कपोले, शिंदे, आव्हाड, गोडसे, सिरसे आदींची उपस्थिती होती. नवीन गावांची पाहणी आणि केकत जळगावपर्यंत काम सुरू करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

Web Title: 'Irrigation' of corruption in Paithan's Brahmagavan scheme; Raise the non issues for the minister's relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.