आता होणार सिंचन सुलभ; सिंचन विभागाला मिळणार १३१८ नवे कर्मचारी

By बापू सोळुंके | Published: July 4, 2024 06:37 PM2024-07-04T18:37:24+5:302024-07-04T18:37:56+5:30

गतवर्षी राज्य सरकारने रिक्त पदांच्या केवळ ३० टक्के पदे भरण्याची परवानगी गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाला दिली.

Irrigation will now be easy; Godawari Marathwada Irrigation department will get 1318 new employees | आता होणार सिंचन सुलभ; सिंचन विभागाला मिळणार १३१८ नवे कर्मचारी

आता होणार सिंचन सुलभ; सिंचन विभागाला मिळणार १३१८ नवे कर्मचारी

छत्रपती संभाजीनगर : गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळातील विविध संवर्गांतील सुमारे ६५ टक्के पदे रिक्त आहेत. राज्य सरकारने गतवर्षी महामंडळातील विविध आठ संवर्गांतील १३१८ रिक्त पदे भरण्यास परवानगी दिली होती. ही भरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून, महिनाभरात उमेदवारांना नियुक्तीपत्र दिली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

लघुलेखक वगळता उर्वरित पदांची गतवर्षी डिसेंबरमध्ये लेखी परीक्षा घेण्यात आली. गुणवत्ता यादीतील २,३०८ उमेदवारांच्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. आता यातील १३११ उमेदवार लवकरच महामंडळाच्या सेवेत दाखल होणार आहेत. स्टेनोग्राफरच्या सात रिक्त पदांसाठी लवकरच परीक्षा घेण्यात येणार आहे.

दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणीदार करण्यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळातर्फे नवीन धरण, उच्च पातळी बंधारे बांधणे आणि जलव्यवस्थापन करण्याचे काम केले जाते. लघू, मध्यम व मोठ्या अशा सुमारे ९०० प्रकल्पांमार्फत मराठवाड्यात सिंचन केले जाते. या प्रकल्पांच्या दुरुस्तीची जबाबदारीही जलसंपदा विभागाची आहे. मात्र, काही वर्षांपासून कालवा निरीक्षक, मोजणीदार, दप्तर कारकून, सहायक भांडारपाल, अनुरेखक, आरेखक, सहायक आरेखक आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायक यांसह अभियंते सतत निवृत्त होत आहेत. मात्र, या रिक्त पदांची भरती न झाल्याने गतवर्षीपर्यंत महामंडळातील रिक्त पदांची संख्या सहा हजारांहून अधिक होती.

गतवर्षी राज्य सरकारने रिक्त पदांच्या केवळ ३० टक्के पदे भरण्याची परवानगी गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाला दिली. स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांची ४३२ पदे, सहायक आरेखक १३ पदे, आरेखक ५, अनुरेखक ६८, सहायक भांडारपाल ३५, दप्तर कारकून १३४, कालवा निरीक्षक ३८८, मोजणीदार १३६ पदे तसेच लघुलेखकांची ७ अशी एकूण १ हजार ३१८ पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली होती.

स्थानिक उमेदवारांना संधी द्यावी
सिंचन व्यवस्थापनाशी संंबंधित वर्ग ३ ची पदे भरताना मराठवाड्यातील उमेदवारांचीच नियुक्ती करावी; कारण अन्य प्रांतांतील उमेदवारांची येथे नियुक्ती झाल्यास ते बदली करून घेऊन अन्यत्र जातात. रिक्त पदावर दुसरा उमेदवार न आल्यास येथील पदे रिक्तच राहतात.
- जयसिंग हिरे, निवृत्त सहायक मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग.

Web Title: Irrigation will now be easy; Godawari Marathwada Irrigation department will get 1318 new employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.