छत्रपती संभाजीनगरात महावितरणला उपकेंद्रांसाठी कुणी जागा देतंय का जागा?

By साहेबराव हिवराळे | Published: June 27, 2024 07:58 PM2024-06-27T19:58:59+5:302024-06-27T19:59:13+5:30

दोन उपकेंद्रांसाठी जमिनी मिळाल्या; पण गैरसोयीच्या; एकासाठी जागाच मिळेना

Is anyone giving space for sub-centres of Mahavitaran in Chhatrapati Sambhaji Nagar? | छत्रपती संभाजीनगरात महावितरणला उपकेंद्रांसाठी कुणी जागा देतंय का जागा?

छत्रपती संभाजीनगरात महावितरणला उपकेंद्रांसाठी कुणी जागा देतंय का जागा?

छत्रपती संभाजीनगर : नवीन वीज उपकेंद्रासाठी वाळूज, करोडी, लिंबे जळगाव, साजापूर, तीसगावच्या क्षेत्रालगत असलेल्या ग्रामपंचायतीने जमीन उपलब्ध करून द्यावी, यासाठी महावितरणने बरीच खटपट केली. सुधारित वितरण क्षेत्र योजना (आरडीएसएस)साठी साजापूर, तिसगाव ग्रामपंचायतीने जमीन दिली; परंतु ती सोयीची नसल्याने वाळूज औद्योगिक क्षेत्रात उपकेंद्र बनविण्याचा प्रकल्प रखडला आहे.

जमीन द्या, उद्योग येणार असल्याने तुमचाही व्यवसाय वाढेल, त्याचा फायदा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांना होईल, असे समुपदेशन महावितरण, महापारेषण करत आहेत. परंतु, याविषयी कुणीही अजून पुढे आलेले नाही. साजापूर परिसरातील जमिनीवरील मुरूम खोदून नेण्यात आल्याने जमीन ओबडधोबड बनली आहे. तिसगाव ग्रामपंचायतीने दिलेली जमीन अगदी दूर कोपऱ्यात गैरसोयीच्या ठिकाणी असल्याने महावितरण नाखूश आहे.

६० एकर शासकीय जमिनीची पाहणी
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२.० मध्ये जोडवाडी येथे १२ मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प मंजूर झाला आहे. या प्रकल्पासाठी उपलब्ध असलेल्या ६० एकर शासकीय जमिनीची केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाचे सहसचिव शशांक मिश्रा यांनी पाहणी केली. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज जवळच्या आडूळ, चित्ते पिंपळगाव व खोडेगाव ३३ केव्ही उपकेंद्रांमार्फत शेतकऱ्यांना दिवसा मिळणार आहे.

ग्रामपंचायतीने पुढे यावे..
गट क्रमांकात नवीन उद्योग आले असून, त्यांना त्यांच्या मागणीनुसार महावितरण वीज देण्याच्या तयारीत आहे. परंतु, त्यांच्यासाठी ज्या जमिनी दिल्या आहेत, त्या अत्यंत गैरसोयीच्या असल्याने खूप अडचणी आहेत. वाळूज औद्योगिक क्षेत्र गटक्रमांकातही अखंडित वीज देणार आहेत. जमीन देण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढे यावे.
- प्रवीण दरोली, अधीक्षक अभियंता

प्रयत्न सुरू
गट क्रमांकातील उद्योजकांच्या क्षमतेची वीज देण्यासाठी उपकेंद्र प्रस्तावित करत आहे. अडचणींचा निपटारा केला जात आहे.
- शांतीलाल चौधरी, अधीक्षक अभियंता, शहर मंडळ

Web Title: Is anyone giving space for sub-centres of Mahavitaran in Chhatrapati Sambhaji Nagar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.