खरंच छत्रपती संभाजीनगर राहण्यायोग्य आहे का? शहरात जिकडे तिकडे समस्यांचा डोंगर

By मुजीब देवणीकर | Published: June 17, 2023 04:24 PM2023-06-17T16:24:58+5:302023-06-17T16:25:28+5:30

लिव्हिंग इंडेक्समध्ये देशात ३४ व्या क्रमांकावर, या समस्यांवर ठोस उपाययोजनाही दिसून येत नाहीत.

Is Chhatrapati Sambhajinagar really livable? 34th in the country in living index | खरंच छत्रपती संभाजीनगर राहण्यायोग्य आहे का? शहरात जिकडे तिकडे समस्यांचा डोंगर

खरंच छत्रपती संभाजीनगर राहण्यायोग्य आहे का? शहरात जिकडे तिकडे समस्यांचा डोंगर

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : केंद्र शासनाने देशभरातील शहरांना रॅकिंग देण्यास सुरुवात केली. २०२१ मध्ये मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरला देशात ३४ वा क्रमांक मिळला. पण खरोखरच हे शहर राहण्यायोग्य आहे का? असा प्रश्न आता अनेकांना पडायला लागला आहे. शहरात जिकडे तिकडे समस्यांचा डोंगर वाढतोय. रस्त्यांचा प्रश्न, जलवाहिन्या, केबल, गॅसलाईनसाठी खोदकाम, दिवसभरातून किमान १० वेळेस विद्युत पुरवठा खंडित होतो, आठ दिवसातून एकदा पिण्याचे पाणी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट नाही, शहराची लाईफलाईन असलेल्या जालना रोडचा खेळखंडोबा, रेल्वे-विमान सेवेचा अभाव दिसून येतो. या समस्यांवर ठोस उपाययोजनाही दिसून येत नाहीत. ‘लोकमत’ने नागरिकांच्या मनातील दु:ख जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न.

काय तर स्मार्ट रस्ते!
स्मार्ट सिटीने ३१८ कोटी रुपये खर्च करून रस्ते तयार करण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षांपूर्वी कामे सुरू झाली. कामांचे कोणतेच नियाेजन नाही. निकृष्ट दर्जा, ठिकठिकाणी तर खोदकाम करून अक्षरश: कामच सोडून दिले. या कामांमुळे सर्वसामान्य नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.

जलवाहिन्यांसाठी खोदकाम
नवीन पाणीपुरवठा योजनेत जलवाहिन्या टाकण्यासाठी शहरभर खोदकाम सुरू आहे. जलवाहिनी टाकल्यानंतर मातीचे ढिगारे तसेच पडून असतात. अनेक ठिकाणी माती खचते, खड्डे पडतात, नागरिकांना होणाऱ्या त्रासाशी संबंधित यंत्रणेला काहीच देणेघेणे नाही.

गॅस-केबलसाठी खड्डे
जी-२० मध्ये रस्त्याच्या कडेला रंगबेरंगी सिमेंटचे गट्टू बसविले. आता अनेक ठिकाणी गॅस लाईन, खासगी कंपनीच्या केबलसाठी गट्टू उखडून फेकून दिल्या जात आहेत. जालना रोडवर हे दृश्य पाहायला मिळते.

विद्युत पुरवठा खंडित
जुन महिना सुरू होताच शहरात विजेचा पुरवठा वारंवार खंडित हाेतोय. त्यामुळे नागरिक कमालीचे वैतागले आहेत.

आठ दिवसातून एकदा पाणी
महापालिकेने खंडपीठात शपथपत्र दिले की, आम्ही चार दिवसाआड म्हणजे पाचव्या दिवशी पाणी देणार आहोत. मात्र, आजही शहराला सहाव्या, सातव्या दिवशीच पाणी मिळत आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था
कामानिमित्त नागरिक, विद्यार्थी, गृहिणींना रिक्षाने प्रवास करायचा म्हटले तर किमान १०० रुपये खर्च होतात. स्मार्ट बसेस ९० धावतात. पण बस कधी येईल, हे कोणत्याच स्थानकावर लिहिलेले नाही.

रेल्वे-विमान सेवेचा अभाव
पर्यटनाची राजधानी असलेल्या शहरात रेल्वे-विमान सेवेचा प्रचंड अभाव आहे. देशातील प्रमुख शहरांना जोडणारी कनेक्टिव्हिटी नाही. रेल्वेचीही अवस्था तशीच आहे.

रात्री ११ नंतर जेवण नाही
पर्यटनाच्या राजधानीत दरवर्षी ३० लाखांहून अधिक पर्यटक येतात. रात्री ११ नंतर येणाऱ्या पर्यटकांना आवडीच्या ठिकाणी जेवणही मिळणार नाही, अशी अवस्था आहे. ठीक ११ वाजता शहर बंद म्हणजे बंद असा फतवाच पोलिसांनी काढलाय.

कनेक्टिव्हिटी वाढावी
छत्रपती संभाजीनगर शहराचे नाव येताच सर्वप्रथम हवाई आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीचा प्रश्न समोर येतो. कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे. सध्या मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू शहरांनाच विमानसेवा आहे. गोवा, इंदूर, उदयपूर, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता या शहरांसाठीही विमानसेवा सुरू झाली पाहिजे. पर्यटकांना हॉटेलमध्ये सोयीसुविधा मिळतात, पण वेरूळ, अजिंठापर्यंतच्या प्रवासात पर्यटकांसाठी स्वच्छतागृहाची कुठेही सुविधा नाही. वेरुळ-अजिंठा येथेही सोयीसुविधा वाढण्याची गरज आहे.
- सुनीत कोठारी, अध्यक्ष, सिव्हिल एव्हिएशन कमिटी, टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशन

Web Title: Is Chhatrapati Sambhajinagar really livable? 34th in the country in living index

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.