पावसाळा आहे की उन्हाळा? एसीमुळे वीजबिलही वाढले !
By साहेबराव हिवराळे | Published: August 25, 2023 07:14 PM2023-08-25T19:14:24+5:302023-08-25T19:23:07+5:30
वीज वापराचा खर्च वाढलेला आहे. मीटर जोरात फिरू लागले आहे. त्याचा परिणाम मासिक बिलातून दिसणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : उन्हाळ्यात ज्याप्रमाणे सर्रास एसीचा वापर होतो तसाच वापर सुरू असल्याने विजेच्या मागणीत गत एका महिन्यापासून वाढ झाल्याची माहिती आहे. या दिवसांमध्ये दिवसाला विजेचा वापर कमी जास्त होण्याचे प्रमाण असते; मात्र सरासरी काढल्यास विजेचा वापर हा उन्हाळ्याप्रमाणेच सुरू असल्याची माहिती आहे. विजेचा वापर वाढला असला तरी बहुतांश परिसरात आता सोलर पॅनलही लागल्याने विजेची निर्मितीही बरीच होत आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये विजेची मागणी कमी जास्त राहते; मात्र बऱ्याच वर्षांनंतर यावर्षी उन्हाळ्याप्रमाणेच विजेची मागणी असून, वापर वाढला आहे.
तापमानाचा पारा ३२ अंशांवर
उन्हाळ्यातील तापमान ४६ डिग्रीपर्यंत गेलेले असतानाही विजेचा वापर वाढलेला होता. तेवढाच वापर आता तापमान २७.९ ते ३० वर असतानाही सुरू असून, उकाड्याच्या वातावरणामुळे एसी सतत सुरू असल्याचेही दिसून येत आहे. वीज वापराचा खर्च वाढलेला आहे. मीटर जोरात फिरू लागले आहे. त्याचा परिणाम मासिक बिलातून दिसणार आहे.
आतापर्यंत केवळ ४२ टक्के पाऊस
सरासरीच्या ४२-४४ टक्के पाऊस झाला आहे. जुलैत पाऊस आल्यानंतर पावसाने मोठी दांडी मारली. अशातच कडाक्याचे ऊन असल्याने एसीचा वापर वाढला, मात्र शनिवारी पाऊस बरसल्याने वातावरणात थंडावा निर्माण झाला होता. त्याची ही नोंद केवळ १० मि.मि. नोंदण्यात आली.
तलावांतील साठाही तळाला
जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने तलावांमध्ये, तसेच जलसाठ्यांमध्ये पाण्याचा पुरेसा साठा आहे. ३४ पाण्याची उपलब्धता आहे. पिकांचा प्रश्न वाईट असून, तलावात पिण्यासह, वापरण्याच्या पाण्याचा साठा आहे. वाढत्या तापमानामुळे काय अवस्था उद्भवेल हे सांगता येत नाही.
सध्या वीज वापर वाढलेलाच...
सद्या वीज वापर वाढल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. शहरासह जिल्ह्यात उकाडा असल्याने नागरिक घरात एसीचा जास्त वापर करतात. यामुळे पावसाळ्याचे दिवस असतानाही विजेचा वापर वाढल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गतमहिन्यापेक्षा वीज आकार मासिक बिलात दिसून येणार आहे.
- प्रेमसिंग राजपूत, कार्यकारी अभियंता विभाग-१