लोकप्रतिनिधींची भावना महत्वाची नाही का? नामांतरविरोधात खा. इम्तियाज जलील यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 01:10 PM2023-03-04T13:10:04+5:302023-03-04T13:12:25+5:30
शहर नामांतराच्या विरोधात नामांतर विरोधी कृती समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु
छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादसोबत भावनिक नाते आहे. ते नाव तसेच ठेवायला हवे, दिल्लीत बसून कोणी निर्णय घेत असेल तर ही लोकशाही नसून हुकुमशाही आहे. ३०- ३५ वर्षांपूर्वी एका राजकीय पक्षाच्या नेत्याने व्यक्त केलेल्या भावना लक्षात घेता शहराचे नामकरण करता, मी तर लोकप्रतिनिधी आहे, मला हे मान्य नाही. माझी भावना महत्वाची नाही का? असा सवाल खा. इम्तियाज जलील यांनी केला. औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराच्या विरोधात एमआयएम खा. जलील यांनी विविध पक्ष, संघटनांच्या सहकार्याने आज सकाळी ११.३० वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरुवात केली. यावेळी ते बोलत आहे.
केंद्र आणि राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा विरोध करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततेच्या मार्गाने बेमुदत साखळी उपोषण करणार असल्याची माहिती इम्तियाज जलील यांनी दिली. उपोषण कोणत्याही राजकीय पक्षांतर्गत नसून तर औरंगाबाद नावाला पसंत करणाऱ्या नागरिकांच्या सहकार्याने हे उपोषण सुरु आहे. नागरिकांना आपली नाराजी व्यक्त करावी लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला रस्त्यावर उतरावेच लागणार आहे. उपोषण हे फक्त आगामी आंदोलनाची सुरवात आहे. रात्रंदिवस बेमुदत असे हे उपोषण असणार असेही ते म्हणाले.
इतर पक्षातील स्थानिक नेत्यांनी पद सोडावे
औरंगाबाद नावासाठी काही राजकीय पक्षातील स्थानिक नेते साथ देत आहेत. पण त्यांचे वरिष्ठ नेते छत्रपती संभाजीनगर नावाचे समर्थक आहेत. त्यामुळे येथील स्थानिक नेत्यांना खरेच आम्हाला साथ देयची आहे, औरंगाबादसाठी ते आग्रही असतील तर त्यांनी आपल्या पदांवर लाथ मारावी.