टंचाईच्या काळात उपलब्ध पाणी पिण्यायोग्य आहे का?
By विजय सरवदे | Updated: May 23, 2024 19:20 IST2024-05-23T19:19:51+5:302024-05-23T19:20:21+5:30
रासायनिक तपासणी झाली पण, दूषित जलस्त्रोतांची आकडेवारी गुलदस्त्यात

टंचाईच्या काळात उपलब्ध पाणी पिण्यायोग्य आहे का?
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात सध्या ४१२ गावे आणि ६१ वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. एकूण या ४७३ गावांना ६७८ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. शिवाय २८५ गावांमधील ३४६ विहिरींचे अधिग्रहण करून त्यातील पाणी लोकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. मात्र, टंचाईच्या या काळात उपलब्ध पाणी पिण्यासाठी योग्य आहे का, याची काळजी ना प्रशासनाला आहे, ना लोकांना. पाण्याचे नमुने तपासण्याची मोहीम सुरू झाली. पण, दूषित पाण्याचे स्त्रोत किती आहेत. तेथे कोणत्या उपाययोजना केल्या जातात, हे गुलदस्त्यात आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध, सुरक्षित व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे, तसेच जलजन्य आजाराच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवता यावे, यासाठी पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, तसेच मान्सूनपूर्व जलस्त्रोतांची तपासणी करण्याची मोहीम जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन कक्षाने हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत ३० जूनपर्यंत जिल्ह्यातील १५३३ पाणीस्त्रोतांची रासायनिक तपासणी केली जाणार आहे. आतापर्यंत १३८४ पाण्याचे नमुने तपासले असून, ८०६ नमुने प्रयोगशाळेत सादर केल्याची नोंद आहे. त्यापैकी प्रयोगशाळेत रासायनिक पाणी तपासणीचे ५६, तर जैविक तपासणीचे ५५१ पाणी नमुन्यांची तपासणी झाल्याची ऑनलाइन नोंद आहे.
दरम्यान, पाणी तपासणीचा अहवाल अद्यापही स्वच्छ भारत मिशन कक्षाकडे प्राप्त झालेला नाही. त्यामुळे टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा किंवा अधिग्रहीत विहिरींचे पाणी, विंधन विहिरी, नळयोजनेसाठी अस्तित्वात असलेले जलस्त्रोत नागरिकांना पिण्यासाठी सुरक्षित आहेत का, याची प्रशासकीय पातळीवर कोणीही ठामपणे सांगू शकत नाही.
जिल्ह्यातील ८७० जलसुरक्षकांकडे पाणी स्त्रोतांची तापसणी करण्यासाठी रासायनिक किट देण्यात आले आहेत. या एका किटच्या माध्यमातून १०० पाणी नुमन्यांची तपासणी केली जाते. जैविक तपासणीचे देखील किट पोहोच झाले असून, त्याचा तपासणीसाठी एकदाचा वापर केला जातो. वर्षातून एकदाच रासायनिक तपासणी केली जाते, तर जैविक तपासणी वर्षातून दोनवेळा केली जाते.
तालुका - प्रयोगशाळेत दाखल नमुने
छत्रपती संभाजीनगर ११३
फुलंब्री ३४
सिल्लोड १२९
सोयगाव ८०
कन्नड ३२
खुलताबाद १३२
गंगापूर ३४
वैजापूर ८७
पैठण १६५