महापालिकेचे वॉर्ड कार्यालय अधिकृत आहे का? पोलिसांनी मागितली मनपा प्रशासनाकडे माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 02:29 PM2024-07-27T14:29:18+5:302024-07-27T14:30:23+5:30
सातारा-देवळाई भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी एक सुविधा केंद्र सुरू करण्याची संकल्पना दोन वर्षांपूर्वी तत्कालीन प्रशासकांनी मांडली.
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने देवळाई भागात दत्तमंदिराजवळ कार्यालय सुरू केले. या कार्यालयातील लिपिक कृष्णा ठोकळ यांनी एका वकील महिलेला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला. शुक्रवारी पोलिसांनी महापालिकेला एक पत्र पाठवून मनपाचे कार्यालय अधिकृत आहे का? इमारत मालकासोबत भाडेकरार केला का? इ. प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. त्यामुळे प्रशासन अडचणीत सापडले आहे.
सातारा-देवळाई भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी एक सुविधा केंद्र सुरू करण्याची संकल्पना दोन वर्षांपूर्वी तत्कालीन प्रशासकांनी मांडली. त्यानुसार महापालिकेने दत्तमंदिराजवळील इमारतीमधील एक जागा निश्चित केली. कार्यालय सुरू करण्यात आले. मात्र नंतर महापालिकेने निर्णय बदलला. कार्यालय तेथेच तसेच सुरू राहिले. तेथे लिपिक ठोकळ यांनी आपले स्वत:चे कार्यालय थाटले. चार दिवसांपूर्वी याच कार्यालयात एका वकील महिलेला मारहाण करण्यात आली. या प्रकरणात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी आता तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी महापालिकेला विचारले की, प्लॉट क्रमांक ४४, गट नं. १३० मधील कार्यालय महापालिकेने भाड्याने घेतले आहे का? या संदर्भातील करारनामा केला का? भाडे करारनामा कार्यालयीन आदेश, भाडे मनपा कोणाला देते, कार्यालयात एकूण किती कर्मचारी आहेत. संजय गवळे, शेख कलीम, सुरक्षारक्षक दीपक व कंत्राटी सहा कर्मचारी आहेत, त्याची कार्यालय आदेश प्रत द्यावी.
महापालिकेकडूनही चौकशी
देवळाई भागात सुरू असलेले कार्यालय नेमके कोणाचे याची माहिती महापालिका प्रशासनाने घेण्यास सुरुवात केली. प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले की, या संदर्भातील संपूर्ण माहिती घेण्याचे काम सुरू आहे. माहिती आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.