शेरखान खून प्रकरणातील फरार आरोपी इस्माईल नाना अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 06:42 PM2019-03-26T18:42:44+5:302019-03-26T18:45:56+5:30
शेरखान यांच्या खून प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या आता ११ झाली.
औरंगाबाद : हॉटेल व्यावसायिक शेरखान यांचा खून केल्यापासून पसार झालेला संशयित आरोपी इस्माईल नाना ऊर्फ सय्यद इस्माईल सय्यद हुसेन (५२, रा. रशीदपुरा) याला गुन्हे शाखेने सोमवारी सापळा रचून पकडले. इस्माईल नाना हा सतत पोलिसांना चकमा देत होता. पळून गेल्यानंतर त्याच्या पायाला फ्रॅ क्चरही झाले होते. शेरखान यांच्या खून प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या आता ११ झाली.
२८ डिसेंबर २०१७ रोजी रात्री छावणी परिसरात हुसेन खान ऊर्फ शेरखान अलियार खान (५१, रा. छावणी) यांचा लोखंडी रॉडने मारहाण करून खून करण्यात आला होता. पूर्ववैमनस्यातून कट रचून आणि मुन्ना बोचरा याला सुपारी देऊन हा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. शेरखान यांच्या खूनप्रकरणी गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अजबसिंग जारवाल आणि कर्मचाऱ्यांनी तपास करून ८ आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. या गुन्ह्यातील संशयित इस्माईल नाना हा घटनेपासून पसार झाला होता.
दरम्यान, इस्माईल नाना हा दिल्ली आणि परभणी येथील जमात सोबत गेला होता. त्याने अटकपूर्व जामीन मिळावा, याकरिता सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने त्याला जामीन नाकारला होता. दरम्यान, तो दोन दिवसांपूर्वी शहरात आला असून, तो सोमवारी दुपारी महापालिका कार्यालयाजवळ येणार असल्याची माहिती खबऱ्याने पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांना दिली. त्यानंतर सहायक निरीक्षक जारवाल आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी सापळा रचून इस्माईल नानाला पकडले. आरोपी हा जमातला असताना त्याचा अपघात झाल्याने जखमी झाला होता. तेव्हाही त्याने एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्याची माहिती समोर आली.