८५ अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन
By Admin | Published: July 14, 2014 11:48 PM2014-07-14T23:48:43+5:302014-07-15T00:52:45+5:30
हणमंत गायकवाड, लातूर लातूर : कुपोषण मुक्तीचा लढा यशस्वी झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाड्यातील मुलांना आनंददायी शिक्षणासाठी विडा उचलला आहे़
हणमंत गायकवाड, लातूर
लातूर : कुपोषण मुक्तीचा लढा यशस्वी झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाड्यातील मुलांना आनंददायी शिक्षणासाठी विडा उचलला आहे़ खाजगी इंग्रजी नर्सरीच्या धर्तीवर शिक्षण सुरू केले असून, डिजीटल, पेन्टींग, ड्रेस कोड, खुर्च्या-टेबल आणि सुशोभिकरणाने अंगणवाड्या फुलल्या आहेत़ परिणामी, जिल्ह्यातील ८५ अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन मिळाले आहे़
लातूर जिल्ह्यात २ हजार ४०८ अंगणवाड्या असून, १ लाख ८६ हजार बालके या अंगणवाड्यात अक्षरांची ओळख करून घेत आहेत़ ग्रामीण भागातील शून्य ते सहा वयोगटातील बालकांत मोठ्या प्रमाणात कुपोषण होते़ तीव्र कमी वजनाच्या बालकांची संख्या लक्षणीय होती़ त्यामुळे महिला व बालकल्याण विभागाने प्रारंभीच्या काळात कुपोषण मुक्तीची मोहीम अंगणवाड्यात राबविली़ प्रत्येक अंगणवाडीत सकस पोषण आहार, वैद्यकीय तपासणी, औषध व उपचार, बाळगोपाळ पंगत आदी उपक्रम राबविले़ या मोहिमेत गेल्या ७ वर्षांपासून सातत्य राखले़ त्यामुळे कुपोषण मुक्तीत लातूर जिल्हा महाराष्ट्रात दुसऱ्या स्थानावर तर मराठवाड्यात प्रथम स्थानावर आला़ आता केवळ १ हजार ३२५ बालके कमी वजनाची आहेत तर मध्यम श्रेणी वजनातील ७ हजार ५०० आहेत़ उर्वरीत सर्व बालके सदृढश्रेणीत आहेत़ कुपोषण मुक्तीची ही लढाई जिंकल्यानंतर आता महिला व बालकल्याण विभागाने आनंददायी शिक्षण देण्याचा विडा उचलला आहे़ गेल्या ७ महिन्यात ८५ अंगणवाड्या डिजीटल झाल्या आहेत़ प्रत्येक अंगणवाडीत रंगरंगोटी करण्यात आली आहे़ ड्रेसकोड, आयकार्ड, टेबल-खुर्च्या आणि इंग्रजी माध्यमाच शिक्षण दिलं जात आहे़ त्यामुळे मुलं आता अ, ब, क वरून ए, बी, सी, डी वर आले आहेत़ त्यामुळे राष्ट्रीय मानांकनात या अंगणवाड्या टिकल्या असून या ८५ अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे़
५० अंगणवाड्या ‘आयएसओ’च्या स्पर्धेत
८५ अंगणवाड्यांना आएसओ मानांकन प्राप्त झाल्यानंतर अन्य ५० अंगणवाड्या स्पर्धेत उतरल्या आहेत़ येत्या २२ ते २४ जुलै दरम्यान आयएसओ देणाऱ्या संस्थेकडून त्यांचे मूल्यांकन होणार आहे़ त्याची सर्व तयारी महिला व बालकल्याण विभागाने केली असून, या अंगणवाड्याही डिजीटलने सजल्या आहेत़ मुल ड्रेस कोडनेच अंगणवाड्यात येत असून, त्यांनीही ओळखपत्र व अन्य सुविधा पुरविल्या जात आहेत़ तथापि, याही अंगणवाड्यांना निश्चित आयएसओ मानांकन प्राप्त होईल, अशी खात्री महिला व बालकल्याण सभापती प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी व्यक्त केली़
आयुक्तांनी दिले १२५ चे उद्दिष्ट़़़
गावा-गावांत खाजगी इंग्रजी नर्सरी उघडल्यामुळे त्यातोडीच्या अंगणवाड्या करण्याचा महत्वकांक्षी उपक्रम विभागीय आयुक्तांनी घेतला आहे़ त्यानुसार लातूर जिल्ह्यात १२५ अंगणवाड्यांना मानांकन मिळावे, असे उद्दिष्ट महिला व बालकल्याण विभागाला दिले आहे़
१२५ मधील ८५ अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन मिळाले असून आता २२ ते २४ जुलै दरम्यान ५० अंगणवाड्यांचे मूल्यांकन होणार आहे़ मूल्यांकन पथकाकडून तपासणी झाल्यानंतर या अंगणवाड्याही मानांकीत होतील, अशी अपेक्षा महिला व बालकल्याण विभागाला आहे़ त्यादृष्टीने महिला व बालकल्याण विभागाने जय्यत तयारी केली आहे.