महामार्गावरील अपघाताचा मुद्दा आला ऐरणीवर
By Admin | Published: July 28, 2016 12:33 AM2016-07-28T00:33:19+5:302016-07-28T00:51:23+5:30
समिर सुतके , उमरगा ‘तीन वर्षांच्या कालावधीत महामार्गावर अपघातात १३० जणांचा मृत्यू ’ या ‘लोकमत’च्या वृत्ताचे पडसाद मंगळवारी विधानसभेत उमटले.
समिर सुतके , उमरगा
‘तीन वर्षांच्या कालावधीत महामार्गावर अपघातात १३० जणांचा मृत्यू ’ या ‘लोकमत’च्या वृत्ताचे पडसाद मंगळवारी विधानसभेत उमटले. आ. ज्ञानराज चौगुले यांनी औचित्याचा मुद्दा म्हणून अपघाताचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी संबंधित विभागाला आता चौकशीचे आदेश दिले आहेत.
पोलीस ठाण्याच्या हद्दीत रामपूर पाटी ते तलमोडजवळील कर्नाटक सीमेपर्यंत या ३० किमी अंतरावर २०१२-१३ ते २०१६ या तीन वर्षांच्या कालावधीत महामार्गावर झालेल्या अपघातात १३० जण मृत्यूमुखी पडले असून हजारो जखमी झालेले आहेत. याकडे लक्ष वेधत ‘लोकमत’ने या महामार्गाच्या दयनयीय अवस्थेकडेही लक्ष वेधले होते. महामार्गावरील दिशादर्शक फलकांची दुरवस्था झाली आहे. साईडपट्ट्या गायब असून, गतिरोधक नसल्याने गाडीचालकांचे वेगावर नियंत्रण रहात नाही. त्यामुळे या मार्गावर दररोज अपघात होत असल्याचे व त्याकडे महामार्गाशी संबंधित विभागाकडून कानाडोळा केला जात असल्याचे वास्तव पुढे आणले होते. अपघातामुळे निष्पाप लोकांचा बळी जातोय, तर जखमींना कायमचे अपंगत्व येते आहे. महामार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी महामार्ग रस्ते विकास विभाग व इतर संबंधित विभागाची कोणतीही यंत्रणा कार्यरत नाही. तलमोड ते कराळी पाटी येथील वळणावर गाडी चालविताना पुढून येणारे वाहन दिसत नाही तसेच वेगही समजत नाही. याच भागात सगळ्यात जास्त अपघात घडत असतात. या महामार्गाच्या लगतच नवीन महामार्गाचे चौपदीरकरणाचे काम चालू आहे. रस्त्याच्या कडेलाच नवीन रस्त्यासाठी खोलीकरण केले जात आहे. येथे कसलेही सूचना फलक अथवा सुरक्षाकडे नाही. खड्डे चुकविण्याच्या नादात अपघात होत असल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले होते.
विशेष म्हणजे बातमी प्रकाशित झाल्यापासून आतापर्यंत तब्बल सात अपघात होऊन तेथे चार-पाच जणांचा बळी गेला आहे. तर ३० जण जखमी झाले आहेत. आ. ज्ञानराज चौगुले यांनी या वृत्ताची गंभिरपणे दखल घेत सदर मुद्दा मंगळवारी विधानसभेत उपस्थित केला. तसेच प्रधान सचिवांना याबाबत उपाययोजनां करण्याबाबत पत्र दिले. विधानसभेत मुद्दा उपस्थित झाल्यानंतर संबंधित विभागाकडून याबाबतची संपुर्ण माहिती सादर करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचेही आ. चौगुले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.