प्रचारात कचरा प्रक्रिया केंद्राचा मुद्दा; मतदारांना धूर, दुर्गंधीतून मुक्ती देण्याचा शब्द

By मुजीब देवणीकर | Published: November 11, 2024 11:59 AM2024-11-11T11:59:36+5:302024-11-11T12:00:06+5:30

छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव येथील केंद्र टार्गेटवर

Issue of Waste Treatment Center in Election Campaign; A word to relieve the suffering of smoke, stench | प्रचारात कचरा प्रक्रिया केंद्राचा मुद्दा; मतदारांना धूर, दुर्गंधीतून मुक्ती देण्याचा शब्द

प्रचारात कचरा प्रक्रिया केंद्राचा मुद्दा; मतदारांना धूर, दुर्गंधीतून मुक्ती देण्याचा शब्द

छत्रपती संभाजीनगर : शहरात दररोज ४५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. या कचऱ्यावर हर्सूल, पडेगाव आणि चिकलठाणा येथील प्रक्रिया केंद्रावर दररोज प्रक्रिया केली जाते. त्यानंतरही परिसरातील नागरिकांना १२ महिने दुर्गंधीचा असह्य त्रास सहन करावा लागतो. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दुर्गंधीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. भविष्यात हे कचरा प्रक्रिया केंद्रच गायब केले जातील, असा शब्दही राजकीय नेत्यांकडून मतदारांना देण्यात येतोय हे विशेष.

महापालिका मागील ४० वर्षांपासून नारेगाव येथील खुल्या जागेवर कचरा टाकत होती. या कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नव्हती. २०१७ मध्ये या भागातील नागरिकांनी कचरा टाकण्यास मज्जाव केला. त्यानंतर शहरात अभूतपूर्व अशी कचरा कोंडी निर्माण झाली. शहरातील मुख्य रस्त्यांवर कचऱ्याचे अक्षरश: मोठमोठे डोंगर साचले होते. महापालिका प्रशासनाने शहराच्या आसपास अनेक ठिकाणी पर्यायी जागांचा शोध घेतला. मनपाचे पथक जिकडे जात तिकडे नागरिक विरोध करीत. नेमके कचरा कुठे टाकावा, असा मोठा प्रश्न पडला. 

राज्य शासनाने या प्रकरणात हस्तक्षेप केला. शहरातच तीन ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्याचा निर्णय झाला. शासनाने मनपाला १४५ कोटी रुपयांचा विशेष निधीही दिला. या निधीतून सर्वप्रथम चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प उभा केला. या प्रकल्पाला पंचक्रोशीतील शेतकऱ्यांकडून प्रचंड विरोध झाला. मनपाने शेतकऱ्यांच्या सर्व अटी मान्य करीत प्रकल्प सुरू केला. त्या पाठोपाठ पडेगाव येथील प्रकल्प उभा केला. येथे तर परिसरात दाट लोकवस्ती आहे, येथेच अनेकदा जुन्या कचऱ्याला आग लागते. धूर आणि दुर्गंधीचा प्रचंड त्रास नागरिकांना आहे. तिसरा शेवटचा प्रकल्प हर्सूल येथे दोन वर्षांपूर्वी सुरू झाला. नागरिकांचा विरोध आजही कायम आहे. उद्धवसेना, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी कचरा प्रक्रिया केंद्रांमधील दुर्गंधीचा मुद्दा प्रचारात आणला आहे.

मनपासमोर पर्याय नाही
मनपा दररोज कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करीत आहे. भविष्यात हे केंद्र स्थलांतरित करायचे म्हटले तर मनपाला अशक्यप्राय ठरणार आहे. प्रक्रिया केंद्रातील दुर्गंधी कमी करण्यावर प्रशासन काम करू शकते.

Web Title: Issue of Waste Treatment Center in Election Campaign; A word to relieve the suffering of smoke, stench

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.