लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मराठवाड्यात पाण्याचा मुद्दा तापणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 01:28 PM2019-03-25T13:28:46+5:302019-03-25T13:33:57+5:30
मोठ्या, मध्यम, लघु प्रकल्प बंधाऱ्यात फक्त ४.२५ टक्के इतका पाणीसाठा आहे.
औरंगाबाद : मराठवाड्याला यंदाचा उन्हाळा अतिशय भयावह जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. एकीकडे लोकसभा निवडणुकीचे वातावरण तयार होत असताना विभागातील बहुतांश जलप्रकल्प तळाला गेले असून, काही प्रकल्प आटले आहेत. त्यामुळे भर निवडणुकीत पाण्याचा मुद्दा तापण्याची चिन्हे आहेत. मोठ्या, मध्यम, लघु प्रकल्प बंधाऱ्यात फक्त ४.२५ टक्के इतका पाणीसाठा आहे.
विभागातील ११ मोठ्या प्रकल्पांत ३.९० टक्के, ७५ मध्यम प्रकल्पांत ५ टक्के तर ७४९ लघु प्रकल्पांत ५ टक्के पाणीसाठा आहे. १३ बंधाऱ्यांत १० टक्के तर उर्वरित इतर २४ बंधारे आटले आहेत. नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी विभागीय प्रशासन नियोजन करण्याचे प्रयत्न करीत आहे. विभागात सर्वाधिक पिण्याच्या पाण्याची टंचाई औरंगाबाद जिल्ह्यात आहे. १३ लाख नागरिकांना पिण्याचे पाणी टँकरने पुरविले जात आहे. २०८६ हून अधिक विहिरी प्रशासनाने ताब्यात (अधिग्रहित) घेतल्या आहेत. बीड जिल्ह्यात ७ लाख नागरिकांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. ७०० विहिरी प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. त्यानंतर जालना जिल्ह्यातील ५ लाख नागरिकांना टँकरचे पाणी दिले जात आहे. ४०० विहिरी प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत.
३० लाख नागरिकांची तहान टँकरवर
कधी नव्हे एवढे टँकर मार्च महिन्याच्या सुरुवातीला विभागात सुरू असून, १८४६ टँकरने आठ जिल्ह्यांतील सुमारे ३० लाख नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो आहे. येणाऱ्या आठ दिवसांत २ हजारांच्या आसपास टँकरचा आकडा जाईल, असा अंदाज सूत्रांनी वर्तविला. १ हजार ३६८ गावांत, ४८१ वाड्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई सध्या आहे.