‘त्या’ रुग्णालयात आणखी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:04 AM2021-04-15T04:04:52+5:302021-04-15T04:04:52+5:30
लाडगाव रोडवरील एका खाजगी रुग्णालयात १२ एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यातून आलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्याचदिवशी तालुक्यातील ...
लाडगाव रोडवरील एका खाजगी रुग्णालयात १२ एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यातून आलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्याचदिवशी तालुक्यातील चांडगाव येथील एक महिला कोरोना उपचार घेताना याच रुग्णालयात मयत झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या ६० वर्षीय महिलेला कोरोना झाल्यानंतर या रुग्णालयात ९ एप्रिल रोजी उपचारासाठी दाखल केले होते. १२ एप्रिल रोजी या रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णालयाला यापूर्वीही प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. खाजगी दवाखाने परवानगी नसताना कोरोना रुग्णांवर उपचार करून लाखो रुपये लाटत असल्याचे समोर येत आहे.
गुन्हा दाखल झालेला शहरातील डॉक्टर फरार
दोन दिवसांपूर्वी विनापरवाना कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या देवगिरी हाॅस्पिटलच्या डॉ. गणेश अग्रवाल यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून सदर डॉक्टर फरार आहे. आरोग्य विभागाने येथील गैरप्रकार करणाऱ्या मेडिकल व दवाखान्यांची चौकशी सुरू केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. दोन मेडिकलमध्ये अनियमितता आढळल्याने त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यापैकी एक रुग्णालय हे देवगिरी रुग्णालयातील आहे.