वादग्रस्त बनलेली कलचाचणी परीक्षा आता मोबाईल अॅपद्वारे घेण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 07:37 PM2018-11-28T19:37:30+5:302018-11-28T19:38:06+5:30
दोन वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेली कलचाचणी परीक्षा आता मोबाईलवर घेतली जाणार आहे.
औरंगाबाद : दोन वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेली कलचाचणी परीक्षा आता मोबाईलवर घेतली जाणार आहे. मोबाईल अॅपवर ही परीक्षा घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात शिक्षकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
दहावीनंतर विद्यार्थ्यांचा कल कोणत्या क्षेत्राकडे आहे, हे जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागाने श्यामची आई फाऊंडेशनच्या माध्यमातून कलचाचणी घेतली जाते. शिक्षण विभाग, विद्या प्राधिकरण आणि श्यामची आई फाऊंडेशन या तिघांनी मिळून हा उपक्रम सुरू केला आहे. यंदा ही कलचाचणी मोबाईल अॅपद्वारे घेण्यात येणार आहे. यासाठी तालुकानिहाय प्रत्येकी २ प्रतिनिधी आणि एक मास्टर ट्रेनरला प्रशिक्षण देण्यात येईल. मास्टर ट्रेनरला श्यामची आई फाऊंडेशन प्रशिक्षण देईल़ हे मास्टर ट्रेनर प्रत्येक जिल्ह्यातील शाळांना संबंधित मोबाईल अॅप कसे हाताळायचे त्याबाबत प्रशिक्षण देईल.
आणखी एक काम शिक्षकांवर वाढणार आहे. त्यामुळे याविषयी शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. मोबाईल अॅप कलचाचणीसाठी विभाग, जिल्हा, तालुकास्तरावर समन्वयक नेमणार आहेत. कलचाचणी शाळेमध्येच घेणार आहे. त्यामुळे शाळेतील सर्व जबाबदार कर्मचाऱ्यांना ओटीपी आणि इतर माहितीसाठी मोबाईल नंबर नोंदविणे गरजेचे आहे.
कलचाचणीसाठी अपेक्षित सामग्री
प्रशिक्षणासाठी तंत्रस्नेही शिक्षकांकडे अँड्रॉईड मोबाईल फोन आवश्यक आहे. प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात येणारी कल मापन चाचणी ही प्रत्येक शाळेतून मोबाईल अॅपद्वारे घेण्यात येणार आहे़ त्यामुळे संबंधित सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांचा किंवा जबाबदार कर्मचाऱ्यांचा मोबाईल नंबर तसेच शाळेचा यू-डायस क्रमांक या महत्त्वाच्या अनुषंगिक बाबी आवश्यक आहेत.