नातेवाईकांना साेडायला जाणे महागच;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:02 AM2021-09-19T04:02:02+5:302021-09-19T04:02:02+5:30
(स्टार ११९५) खिशाला कात्री : राज्यातील अनेक रेल्वेस्टेशनवर प्लॅटफाॅर्म तिकीट दर झाले १० रुपये संतोष हिरेमठ औरंगाबाद : ...
(स्टार ११९५)
खिशाला कात्री : राज्यातील अनेक रेल्वेस्टेशनवर प्लॅटफाॅर्म तिकीट दर झाले १० रुपये
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वाढविण्यात आलेल्या प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर राज्यातील अनेक रेल्वेस्टेशनवर कमी करून पूर्वीप्रमाणे १० रुपये करण्यात आले आहेत; मात्र औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर नातेवाईकांना थेट रेल्वेपर्यंत साेडायला जाण्यासाठी सर्वसामान्यांच्या खिशाला अजूनही कात्री लागत आहे. कारण, येथे अद्यापही प्लॅटफाॅर्म तिकीट दर ३० रुपयेच आहे. इतर रेल्वेस्टेशनप्रमाणे औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफाॅर्म तिकीट दर कमी करण्याची मागणी होत आहे.
औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर काेराेनापूर्वी प्लॅटफाॅर्म तिकिटासाठी अवघे १० रुपये माेजावे लागत हाेते;मात्र काेराेनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर प्लॅटफॉर्मवरील गर्दी आटाेक्यात राहण्यासाठी देशभरातील रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफाॅर्म तिकिटाच्या दरात वाढ करण्यात आली. गेल्या वर्षभरापासून प्रवाशांना साेडण्यासाठी येणाऱ्यांना रेल्वेपर्यंत जाण्यासाठी प्लॅटफाॅर्म तिकिटासाठी १० रुपयांऐवजी ३० रुपये माेजावे लागत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर गेल्या काही दिवसांत विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफाॅर्म तिकीट दर पुन्हा एकदा १० रुपये करण्यात आले आहेत. औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर मात्र, प्लॅटफाॅर्म तिकीट दर कमी हाेण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.
---
वर्षभरापासून ३० रुपयांचा भुर्दंड
काेराेनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर गतवर्षी रेल्वे बंद करण्यात आल्या हाेत्या. त्यानंतर जूनपासून टप्प्याटप्प्यात रेल्वेगाड्या सुरु करण्यात आल्या. सध्या पॅसेंजर रेल्वे वगळता बहुतांश रेल्वे सुरु झाल्या आहेत. त्या विशेष रेल्वे म्हणून धावत आहेत. वर्षभरापासून प्लॅटफाॅर्म तिकिटासाठी ३० रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
---
राेज सरासरी २५० ते ३०० तिकिटांची विक्री
१. औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर सध्या दरराेज सरासरी २५० ते ३०० प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री हाेत आहे.
२. या तिकिटाचे दर कमी झाले नसून, ३० रुपये हाच दर असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. तिकीट दर कमी करण्यासंदर्भात काही माहिती प्राप्त नसल्याचेही त्यांनी सांगितले.
३. प्लॅटफाॅर्म तिकीट दर वाढल्याने आणि काेराेनाच्या भीतीने गर्दी टाळण्यासाठी अनेकांकडून रेल्वेस्टेशनच्या बाहेरूनच नातेवाईकांना निराेप दिला जात आहे.
----
सुरू असलेल्या रेल्वे
- सचखंड एक्स्प्रेस
- देवगिरी एक्स्प्रेस
- राज्यराणी एक्स्प्रेस
- नंदीग्राम एक्स्प्रेस
- जनशताब्दी एक्स्प्रेस
- तपोवन एक्स्प्रेस
- अंजता एक्स्प्रेस
- रेनीगुंठा एक्स्प्रेस
- मराठवाडा एक्स्प्रेस
- औरंगाबाद- हैदराबाद विशेष रेल्वे
- रोटेगाव- नांदेड डेमू विशेष रेल्वे