होतकरू, तरुण डॉक्टरची कोरोनाविरुद्धची झुंज अखेर अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:05 AM2021-05-27T04:05:02+5:302021-05-27T04:05:02+5:30
औरंगाबाद : ऊसतोड कुटुंबातील मुलगा अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत डॉक्टर झाला. मात्र, कोरोनाबाधितांची सेवा करता-करता तो स्वत: ...
औरंगाबाद : ऊसतोड कुटुंबातील मुलगा अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत डॉक्टर झाला. मात्र, कोरोनाबाधितांची सेवा करता-करता तो स्वत: कधी बाधित झाला, हे त्यालाही समजले नाही. महिनाभरापासून तो एमजीएम हॉस्पिटलमध्ये कोरोनाशी झुंज देत होता. त्याच्या उपचारांसाठी मित्रांनी आणि रुग्णालयाने शर्थीचे प्रयत्न केल; परंतु या उमद्या तरुण होतकरू डॉक्टरची कोरोनाविरुद्धची झुंज अखेर अपयशी ठरली. उपचार सुरू असताना बुधवारी दुपारी त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली.
डॉ. राहुल पवार असे मृत डॉक्टरचे नाव आहे. परभणी जिल्ह्यातील आनंदनगर तांडा (ता. पाथरी) येथील ऊसतोड मजुराच्या कुटुंबात राहुल पवार याचा जन्म झाला. डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले आणि कष्टाने हे स्वप्न साकार केले. लातूर येथील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयातून ‘एमबीबीएस’ची पदवी घेतल्यानंतर तेथेच इंटर्नल म्हणून रुग्णसेवा देत असताना त्याच्याभोवती कोरोनाने फास आवळला. कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रकृती अधिक गुंतागुंतीची झाली. त्याच्या मित्रांनी त्याला ३ मे रोजी औरंगाबादेतील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. राहुलच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे सुरुवातीला त्याच्या सहकारी मित्रांनीच पैसे गोळा करून उपचार व औषधांचा खर्च भागविला. त्यानंतर इतरांनीही मदतीचा हात दिला. एमजीएम रुग्णालयाने राहुल पवार याच्यावरील सर्व उपचार मोफत करण्याचा निर्णय घेतला. एवढेच नव्हे, तर हॉस्पिटलमध्ये जमा करण्यात आलेली सुमारे १ लाख ८० हजारांची रक्कमही राहुलचे नातेवाईक-मित्रांना परत देऊन टाकली.
या होतकरू डॉक्टराचा जीव वाचविण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करीत होता, प्रार्थना करीत होता. कोरोनाला हरवून तो येईल, अशी आशा होती. परंतु, नियतीला ते मान्य नव्हते. बुधवारी दुपारी ३.१५ मिनिटांनी डॉ. राहुल पवार याने या जगातून कायमचा निरोप घेतला. ही माहिती कळताच कुटुंबीय, मित्रपरिवाराला जबर धक्का बसला.
प्रकृती गंभीर
एमजीएम रुग्णालयात ३ मेपासून डॉ. राहुल पवार याच्यावर उपचार सुरू होते. दाखल झाल्यापासून त्याची प्रकृती गंभीर होती. १६ मेपासून तो व्हेंटिलेटरवर होता. दरम्यान, उपचार सुरू असताना त्याला म्युकरमायकोसिसचेही निदान झाले होते. त्याचेही उपचार सुरू होते. इंजेक्शन देण्यात आले होते. परंतु, उपचार सुरू असताना बुधवारी दुपारी मृत्यू झाला, अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. आर. राघवन यांनी सांगितले.