औरंगाबादमध्ये पहिला रुग्ण आढळल्याला झाले १०० दिवस; आज बहुतांश भागात कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 07:39 PM2020-06-22T19:39:45+5:302020-06-22T19:42:00+5:30
शहरात १५ मार्च रोजी पहिल्या पॉझिटिव्ह रुग्णाचे झाले होते निदान
औरंगाबाद : शहरात पहिल्या रुग्णाचे निदान होऊन २२ जून रोजी १०० दिवस पूर्ण होत आहेत. या १०० दिवसांत रुग्णसंख्येने एकवरून थेट साडेतीन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. पहिल्या दोन महिन्यांत रुग्णसंख्या आटोक्यात येईल, असे वाटत असतानाच दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
शहरात १५ मार्च रोजी पहिल्या कोरोना रुग्णाचे निदान झाले होते. परदेशातून आलेल्या प्राध्यापक महिलेचा अहवाल यादिवशी पॉझिटिव्ह आला होता. तेव्हा आरोग्य यंत्रणा हादरून गेली होती. आरोग्य विभाग, मनपा प्रशासनाने या रुग्णाच्या संपर्कातील जवळपास ६०० लोकांची तपासणी केली; परंतु कोणीही कोरोनाबाधित आढळून आले नाहीत. हा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला आणि आरोग्य यंत्रणेने आणि नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, एप्रिलपासून नवे रुग्ण सापडत गेले.
शहरातील पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील प्रत्येक व्यक्ती निगेटिव्ह आढळून आली होती. त्यामुळे शहर दुसऱ्या टप्प्यापासून दूर होते. मात्र, त्यानंतर आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कातील लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. त्यामुळे शहर दुसऱ्या टप्प्यात पोहोचले. वाढत्या संख्येने आता शहर तिसऱ्या टप्प्यात गेल्याची भीती व्यक्त होत आहे. १५ मार्चपासून २६ एप्रिल रोजी एकेरी संख्येतच कोरोनाच्या रुग्णांचे निदान होत गेले. त्यानंतर २७ एप्रिल रोजी कोरोनाने दुहेरी संख्येत शिरकाव केला. या तारखेपासून शहरात रोज दुहेरी आकड्यांत कोरोनाच्या रुग्णांचे निदान होत आहे. यात ८ मे रोजी पहिल्यांदा तिहेरी आकड्यात रुग्णांचे निदान झाले. यादिवशी १०० रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तर आता कोरोनाच्या रुग्णसंख्येने दिवसभरात दीडशेचा आकडाही पार केला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासून दररोज नव्या रुग्णांचे निदान होत आहे. धक्कादायक म्हणजे सुरुवातीला काही भागांत मर्यादित असलेल्या कोरोनाने शहरातील बहुतांश भागांत शिरकाव केला आहे. शहराची ही परिस्थिती अवघ्या १०० दिवसांत झाली आहे.
जूनमध्ये 56% रुग्ण :
औरंगाबादेत १५ मार्च ते ३१ मेपर्यंत म्हणजे ७८ दिवसांत १५४३ रुग्णांचे निदान झाले होते. मात्र, जूनच्या २१ दिवसांत रविवारी सायंकाळपर्यंत १९७२ रुग्णांचे निदान झाले. १०० दिवस पूर्ण होताना रुग्णसंख्या साडेतीन हजारांवर गेली. एकूण ५६ टक्के रुग्ण जूनमध्ये आढळून आले.
अशी वाढली संख्या : औरंगाबादेत मार्चमध्ये केवळ एक रुग्ण होता. एप्रिलअखेर ही संख्या १७७ झाली. त्यानंतर ३१ मेपर्यंत एकूण रुग्णसंख्या १५४३ झाली. एकट्या मे महिन्यात १३६६ रुग्ण आढळून आले. त्यानंतर जूनच्या २१ दिवसांत मे महिन्यापेक्षाही अधिक रुग्ण आढळले आहेत.
लॉकडाऊन संपले, कोरोना नाही : १५ मार्च रोजी निदान झाले होते, तेव्हा वेळीच उपचार घेतला. ते अधिक महत्त्वाचे ठरले. माझ्या संपर्कातील कोणालाही बाधा झाली नाही, ही मोठी समाधानाची बाब होती. मी १५ एप्रिलपासून कामही सुरू केले आहे. आॅनलाईन शिकविले जात आहे. नागरिकांनी पुरेशी काळजी घेण्याची गरज आहे. लॉकडाऊन संपले म्हणून कोरोना गेला असे नाही. जबाबदारी पार पाडली पाहिजे. स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. - पहिल्या पॉझिटिव्ह आणि कोरोनामुक्त प्राध्यापिका