‘...अन्यथा स्वप्नात आली होती चिऊताई’ असे म्हणावे लागेल !
By साहेबराव हिवराळे | Published: March 20, 2023 06:18 PM2023-03-20T18:18:41+5:302023-03-20T18:19:39+5:30
२० मार्च जागतिक चिमणी दिवस : पाखरांच्या किलबिलाटाने सारेच प्रसन्न
छत्रपती संभाजीनगर : कडक उन्हाळा सुरू होत आहे. घरटी गायब झाल्याने पक्ष्यांसाठी पाणी, अन्न ठेवा... अन्यथा ‘स्वप्नात आली होती एक चिऊताई’ असेच चिमुकल्यांना सांगण्याची वेळ येऊ शकते.
गत दहा वर्षांपासून मोबाइलच्या लहरींमुळे ‘चिमणी पाखरं’ शहरातून छूमंतर होऊ लागली. परंतु, आता हळूहळू परत ती शहराच्या दिशेने येऊ लागली आहेत. तथापि, छतावरील पाण्याच्या टाक्यांना झाकण असते. त्यासह नळाची तोटीही बंद असते. यामुळे पाखरांना पाणी पिता येत नाही. म्हणून सामाजिक संघटना तसेच पक्षीप्रेमींनी शहरात अभियान राबवून ‘घराच्या छताला पाण्याचे भांडे लटकवा’ तसेच अंगणात पाणी, दाणे टाका, असे आवाहन केले आहे. चोचीत मावेल एवढाच घास घेऊन चिमणी चिव चिव करून पाणी पिऊन भुर्रर्र उडून जाते. हे पाहण्याचा आनंद काही निराळाच असतो. या पक्ष्यांच्या तृप्ततेतून मानवाला पुण्य व समाधानच मिळते.
चिमण्यांसाठी उभारले घरटं...
शहरात चिमण्यांसाठी पाणी ठेवावे. घरातील कोणीतरी ही जबाबदारी घेतल्यास चिमण्यांचा चिवचिवाट निसर्गाशी एकरूपतेचा आनंद देईल.
- सांडूजी गायकवाड, ज्येष्ठ नागरिक
भांडी मोफत देणार...
दरवर्षी पक्ष्यांसाठी मातीची पाण्याची भांडी मोफत वाटण्याचे काम लाईफ केअर ॲनिमल वेल्फेअर असोसिएशन करते. यंदा श्वान तसेच बेवारस जनावरांसाठीही विविध मोकळ्या जागांवर पाणी पिण्यासाठी भांडी ठेवली जाणार आहेत.
- जयेश शिंदे (पक्षीप्रेमी)
अन्नसाखळीत पक्षी महत्त्वाचा घटक
निसर्गचक्रात विविध पक्षी, जीवजंतू हे अन्नसाखळीतील घटक मानले जातात. निसर्गातील बदल पक्ष्यांना अगोदर कळतात. बागेत तसेच दारात येणाऱ्या चिमण्या व पक्ष्यांना पाणी व अन्न द्या.
- डॉ. किशोर पाठक , मानद वन्यजीव सदस्य