बाळासाहेबांच्या मुलाला बाजूला करून स्वतः पद घेणे पाप; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 07:25 PM2022-06-23T19:25:26+5:302022-06-23T19:25:51+5:30
महाविकास आघाडीच्या आग्रहावरून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारले.
औरंगाबाद: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी छोट्या शिवसैनिकांना मोठे केले. पद दिले, आमदार केले. परंतु, त्याच्या मुलाला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बाजूला करून स्वतः पद घेयचे. बंडखोरी करून आमदारांनी पाप केले आहे. हा बाळासाहेबांना धोका देणे आहे, अशा भावना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केल्या. ज्यांना शिवसेनेने मोठे केले, सर्वकाही दिले त्यांचे असे वागणे चुकीचे असे सांगताना खैरे यांच्या डोळ्यात अश्रू तराळले होते.
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला औरंगाबाद जिल्ह्यातील पाच आमदारांनी पाठिंबा दिला आहे. यात एक कॅबिनेट, एक राज्यमंत्री आणि तीन आमदारांचा समावेश आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात अशी वाताहत झाल्याने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे भावूक झाले आहेत. मुंबईवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट देऊन परत आल्यानंतर खैरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंडखोरांनी केलेले कृत्य म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना धोका देण्यासारखे आहे. बंडखोर आमदार संजय शिरसाट रिक्षाचालक तर मंत्री संदीपान भुमरे कारखान्यात कामगार होते. अशा सामान्य शिवसैनिकांना शिवसेनाप्रमुखांनी मोठे केलं.आमदार केले. अशा शिवसेना प्रमुखांच्या सुपुत्राला बाजूला करून स्वतः पद घेयचे हे पाप आहे. महाविकास आघाडीच्या आग्रहावरून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारले. अडीज वर्षांच्या कालावधीत त्यांनी अनेक कामे केली. शिरसाट, भुमरे यांनी सर्वात जास्त निधी मिळवला. त्यांना काय कमी केले. त्यांना काय कमी पडले, असा सवालही खैरे यांनी बंडखोरांना केला.
चुकले कुठे ? नितीमत्ता नाही राहिली
असे बंडखोरी करून काय मिळणार. ऐवढे सगळे मिळूनही त्यांनी बंडखोरी केली. पक्षाने त्यांना खूप काही दिले. आयुष्य बदले. मतदारसंघात मोठा विकास निधी मिळाला. महाविकास आघाडी अडीज वर्ष केवळ उद्धव ठाकरे यांच्यामुळे टिकली. त्यांना धोका देणे चुकीचे आहे. या लोकांकडे नितीमत्ता राहिली नाही, अशी खंतही खैरे यांनी व्यक्त केली.