आजार होऊच नये, हे महत्वाचे; अन्यथा व्यवस्था वाढवली तरी कमी पडेल: गिरीश महाजन
By संतोष हिरेमठ | Published: April 7, 2023 12:42 PM2023-04-07T12:42:18+5:302023-04-07T12:43:28+5:30
देशभरात तसेच राज्यात विशिष्ट कारणामुळे अवयव निकामी झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे व त्याकरिता अवयवाची मोठी गरज आहे.
छत्रपती संभाजीनगर : आजार होणारच नाही, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. अन्यथा कितीही व्यवस्था वाढवली तर त्या कमी पडतील. अवयवदानाची जनजागृती होणे गरजचेचे आहे. वेळेवर गरजू रुग्णांना अवयव मिळत नाहीत, अवयवदानची चळवळ महत्वाची आहे, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन म्हणाले.
जागतिक आरोग्य दिनापासून राज्यातील प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 'अवयवदान जनजागृती अभियान' राबविण्यात येणार आहे. या अभियानाचे उद्घाटन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खा. इम्तियाज जलील, आ. हरिभाऊ बागडे, आ. प्रशांत बंब, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता डॉ. संजय राठोड, उपअधिष्ठाता डॉ. कैलास झिने, डॉ.मिर्झा शिराझ बेग , डॉ. काशिनाथ गर्कळ, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्यअधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कल्याणकर , डॉ. सुधीर चौधरी, डॉ. मंगला बोरकर, भाजप शहराध्यक शिरीष बोराळकर, बापू घडामोडे आदी उपस्थित होते.
देशभरात तसेच राज्यात विशिष्ट कारणामुळे अवयव निकामी झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे व त्याकरिता अवयवाची मोठी गरज आहे. समाजातील काहीशा गैरसमजामुळे अवयव दान करण्यात येत नाही. सबब त्याबद्दल जनजागृती होणे आवश्यक आहे. त्याकरिता अवयव दान जागृती अभियान राबविण्यात येत आहे.