'अपेक्षा ठेवणे गैर नाही', मंत्री होणारच यावर शिरसाट ठाम; 'त्या' ट्विटवर म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 01:44 PM2022-08-13T13:44:33+5:302022-08-13T13:44:51+5:30
जिल्ह्यातील मंत्री पदाच्या संख्येची अडचण नाही, मला मंत्रिपद मिळणारच
औरंगाबाद: राजकारणात अपेक्षा ठेवणे गैर नाही. जिल्ह्यात किती मंत्री आहेत याला काही अडचण नाही. मंत्री संपूर्ण राज्याचा असतो जिल्ह्याचा नसतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील मंत्रिमंडळ विस्तारात नक्की विचार करू असे म्हटले आहे. त्यामुळे मंत्रिपद मिळण्यात काही अडचण नाही, असा विश्वास शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.
मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक आ. संजय शिरसाट नाराज असल्याची चर्चा आहे. शुक्रवारी सायंकाळी आ. शिरसाट यांचे औरंगाबादेत आगमन झाले. यावेळी देखील त्यांनी आपण मंत्री बनणार असे माध्यमांना सांगितले. मात्र, रात्री अचानक आ. शिरसाट यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक ट्विट करण्यात आले. यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जुने भाषण होते. त्यावर कुटुंबप्रमुख उद्धव ठाकरे असे कॅप्शन होते. त्यामुळे शिरसाट यांची घरवापसी होणार, अशा चर्चा सुरु झाल्या. यावर आता आ. शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली असून हा तांत्रिक गोंधळ आहे असे स्पष्ट केले आहे. चुकून मागील व्हिडिओ फॉरवर्ड झाला. मी नाराज नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे असे शिरसाट म्हणाले.
पालकमंत्री होण्याची इच्छा
जिल्ह्यात किती मंत्री आहेत,याचा मला मंत्रीपद काही अडसर नाही. मंत्री झाल्यास कोणी जिल्ह्यात बसत नसतो. तो राज्यात काम करतो. प्रत्येक शहरात, खेड्यात जातो. यामुळे पुढील मंत्रिमंडळ विस्तारात नक्कीच मंत्रिपद मिळेल. तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी मला पालकमंत्री होण्याची इच्छा आहे. शहराचा विकास खूप मंदगतीने होत आहे. मागील काही काळात जिल्हावासीयांनी जे सोसले त्याचा मी साक्षीदार आहे. यामुळे ठोस काम करण्याची माझ्यात ताकद आहे,असेही आ. शिरसाट म्हणाले.