मराठ्यांवर शंभर टक्के अन्याय होणार हे दिसतंय;आम्ही ताकदीने उठाव करू, जरांगेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 04:43 PM2024-06-26T16:43:46+5:302024-06-26T16:53:31+5:30
सरकार दखल घेतच नाही. ज्या नोंदी निघाल्यात त्यांची दस्तावेज शोधत नाहीत, रेकॉर्ड शोधत नाहीत.
- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : मराठयांवरती शंभर टक्के अन्याय होणार आहे, हे दिसतंय. म्हणून आता आम्ही ताकदीने उठाव करणार असल्याचा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला. आज सकाळी अंतरवाली सराटी येथे जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगे-पाटील मंगळवारी अंतरवाली सराटी गावातील उपोषणस्थळी दाखल झाले. सरकारला महिनाभराची मुदत दिल्यानंतर जरांगे पुढील दिशा ठरवत आहेत. दरम्यान, आज दुपारी त्यांनी माध्यम प्रतिनिधींना संवाद साधला, सरकार दखल घेतच नाही. ज्या नोंदी निघाल्यात त्यांची दस्तावेज शोधत नाहीत, रेकॉर्ड शोधत नाहीत. प्रमाणपत्र द्यायचे बंद केले याचा अर्थ ओबिसीच्या नेत्यांचा प्रचंड दबाव सरकारवर आला असल्याचे जरांगे म्हणाले.
दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीने सगेसोयरेचा अध्यादेश रद्द करावा तथा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये या स्वरूपाचे बॅनर लावलेत ,यावर बोलताना मनोज जरांगे यांनी वंचित बहुजन आघाडीने अशी का भूमिका घेतली हे आपल्याला माहिती नाही. मात्र, प्रकाश आंबेडकर यांचा आपल्याला स्पष्टपणा आवडतो त्यामुळे आपण अगोदर ही सन्मान करत होतो आणि उद्याही करत राहू असे जरांगे म्हणाले.