अडत बाजारातील गर्दी रोखणे कृउबाची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:06 AM2021-03-13T04:06:42+5:302021-03-13T04:06:42+5:30
औरंगाबाद : जाधववाडी परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरणाऱ्या फळ व भाजीपाल्याच्या अडत बाजारात गर्दी रोखण्याची संपूर्ण जबाबदारी ...
औरंगाबाद : जाधववाडी परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरणाऱ्या फळ व भाजीपाल्याच्या अडत बाजारात गर्दी रोखण्याची संपूर्ण जबाबदारी बाजार समितीची आहे. किरकोळ विक्रेते व ग्राहक येथे दिसल्यास त्याच्यावर कारवाई करा, त्यासाठी खासगी सुरक्षारक्षक नेमा, अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिल्या.
भाजीपालाच्या अडत बाजारात होणारी प्रचंड गर्दी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ११ ते १७ मार्च दरम्यान फळ व भाजीपालाचा अडत बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र, आता शेतकरी व किरकोळ विक्रेते बाजार समितीबाहेरील रस्त्यावर बसू लागल्याने प्रशासनासमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे. शुक्रवारी सकाळी रस्त्यावरून विक्रेत्यांना उठविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांनी बाजार समितीत भेट घेतली. त्यावेळी बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे, सचिव विजय शिरसाठ, संचालक शिवाजी दांडगे, देवीदास कीर्तीशाही यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर केला. त्यावेळीस जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले की, शेतकऱ्यांना त्रास, झाला नाही पाहिजे. यासाठी बाजार समितीने स्वतः नियोजन करावे. किरकोळ विक्रेते व ग्राहक यांच्यामुळे बाहेर समितीमध्ये प्रचंड गर्दी होते. त्यांना शहरतील मनपाच्या मैदानावर स्थलांतरित करण्यासंदर्भात मी मनपा आयुक्तांशी चर्चा करतो. मात्र, बाजार समितीत होणारी गर्दी रोखण्याची संपूर्ण जबाबदारी बाजार समितीची राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
चौकट
बाजार समितीचा प्रस्ताव
यापुढे भाजीपाल्याच्या अडत बाजारात
किरकोळ विक्रेते व ग्राहकांना येण्यास प्रतिबंध करण्यात येईल.
किरकोळ विक्रेते, ग्राहक आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.
दुकानासमोर किरकोळ विक्रेते बसले तर त्या दुकानदार अडत्याचे परवाने रद्द करण्यात येईल.
किरकोळ विक्रेत्यांना मनपाने अन्य मैदानावर बसण्याची परवानगी दिल्यास गर्दीचे विभाजन होईल व बाजार समितीवरील ताण कमी होईल.