आयटी पार्कचे बाह्यरूप बदलतेय

By Admin | Published: May 28, 2014 01:03 AM2014-05-28T01:03:33+5:302014-05-28T01:14:44+5:30

प्रशांत तेलवाडकर , चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील आयटी पार्क आता आपले बाह्यरूप बदलत आहे.

IT Park's exterior changes | आयटी पार्कचे बाह्यरूप बदलतेय

आयटी पार्कचे बाह्यरूप बदलतेय

googlenewsNext

प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाद ऐतिहासिकनगरीला ग्लोबल व्हिजन मिळवून देणार्‍या चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील आयटी पार्क आता आपले बाह्यरूप बदलत आहे. ३३ वर्षे जुन्या इमारतीला येत्या महिनाभरात नवा चेहरा मिळत आहे. सुमारे २ कोटी रुपये खर्च करून तीन मजली इमारतीचा बाह्यभाग ग्लॅस पॅनल उभारून आधुनिक करण्यात येत आहे. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील १९ वर्षे जुन्या इमारतीमध्ये २००० साली सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कला सुरुवात झाली होती. या पार्कचे उद्घाटन २ फेब्रुवारी २००० रोजी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले होते. अवघ्या दोन कंपन्यांपासून या पार्कमधील कामकाजाला सुरुवात झाली होती. मागील १४ वर्षे ३ महिन्यांच्या काळात येथील इमारतीचे बाह्यरूप खराब झाले होते. इमारतीचे बाहेरील स्ट्रक्चर जुने वाटू लागले होते. कामाच्या निमित्ताने येथे देश-विदेशातून विविध कंपन्यांचे संचालक, पदाधिकारी, अधिकार्‍यांची नेहमी वर्दळ असते. ‘फस्ट इप्रेशन इज लास्ट इप्रेशन’ असे म्हटले जाते. जेव्हा विदेशी कस्टमरला या इमारतीत आणले जात होते तेव्हा बहुतांश जण या जुन्या इमारतीकडे पाहून नाक मुरडत असत. एवढेच नव्हे तर येथे वाहन पार्किंगसाठी जागाही नव्हती. अंतर्गत रस्त्यावरच फोर व्हीलर, टू व्हीलर पार्किंग करण्यात येत होते. मुख्य इमारतीसमोरील व्हरांड्यातच टू व्हीलरची पार्किंग असल्याने पायी चालणेही कठीण झाले होते. यासंदर्भात २०१० मध्ये सीएमआयच्या शिष्टमंडळाने तत्कालीन उद्योगमंत्री राजेंद्र दर्डा यांची भेट घेऊन बैठक घेऊन आयटी पार्कच्या इमारतीचा चेहरामोहरा बदलण्याची विनंती केली होती. या कामास त्वरित मान्यता देऊन उद्योगमंत्र्यांनी एमआयडीसीला इमारतीचे काम करण्याचे आदेश दिले होते.आता त्या निर्णयाची अंमलबजावणी एमआयडीसीच्या वतीने करण्यात येत आहे. या तीन मजली इमारतीच्या समोरील बाजूस ग्लास पॅनल व अ‍ॅल्युमिनिअम पॅनल उभारले जात आहे. यासाठी सुमारे अडीच कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत असून, येत्या महिनाभरात हे काम पूर्ण केले जाणार आहे. यानिमित्ताने तीन मजली इमारतीला नवीन चकचकीत चेहरा प्राप्त होऊ लागला आहे. आयटी पार्कमध्ये वाहनांच्या पार्किंगचे नियोजन करण्यात आले नव्हते. यामुळे वाटेल तेथे वाहने उभी केली जात होती. रस्त्यावरच फोर व्हीलर पार्क केले जाई, तर आयटी पार्कच्या मुख्य इमारतीसमोरील व्हरांड्यातच टू-व्हीलर लावले जात असत. यामुळे पायी चालणे कठीण होत असे. मात्र, आता मुख्य इमारतीच्या समोरील बाजूस असलेल्या भूखंडावर पार्किंगची व्यवस्था करण्यात येत आहे. तेथेही फोर व्हीलरसाठी व टू-व्हीलरसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत असून, सावलीसाठी शेड उभारण्यात येत आहे. १४ देशांना होते सॉफ्टेवअरची निर्यात आयटी पार्कमध्ये अवघ्या २ आयटी कंपन्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. २००४ मध्ये येथे ८ कंपन्या या क्षेत्रात होत्या. आजघडीला आयटी पार्कमध्ये ३० कंपन्या कार्यरत आहेत. यात काही कंपन्या बीपीओचा जॉब करतात, तर काही कंपन्या ‘हाय एंड’ तंत्रज्ञानावर जॉब करतात. अमेरिका, कॅनडा, जर्मनी, हॉलंड आदी १४ देशांत सॉफ्टवेअरची निर्यात केली जाते. मेकॅनिकल, स्ट्रक्चरल, आर्किटेक्चरल डिझाईनसारखे उच्चदर्जाचे काम येथे केले जाते. ५ हजार कर्मचार्‍यांना नोकरी येथे या क्षेत्रात आयटी पार्कमध्ये २००४ मध्ये ८ कंपन्या होत्या. ७० कर्मचारी काम करीत होते. आजघडीला आयटी पार्कमध्ये ३० कंपन्यांमध्ये ५ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. यात बीपीओचा जॉब करणारे ४ हजार, तर सॉप्टवेअर डेव्हलपमेंटचे काम करणारे १ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. वार्षिक १०० कोटींची उलाढाल आयटी पार्कमध्ये २८ गाळे असून, येथे १३ कंपन्या तर आसपासच्या क्षेत्रात सुमारे १७ कंपन्या आयटी क्षेत्रात काम करीत आहेत. यांची वार्षिक उलाढाल १०० कोटींच्या घरात जाऊन पोहोचली आहे. त्यापैकी २० कोटींची उलाढाल फक्त निर्यातीतून होते.

Web Title: IT Park's exterior changes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.