ऐतिहासिक वास्तू जतन करण्याची जबाबदारी तरुणाईवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:05 AM2021-09-26T04:05:26+5:302021-09-26T04:05:26+5:30
औरंगाबाद : या शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. मागील काही वर्षांपासून हा वारसा हळूहळू नष्ट होत चालला आहे. ...
औरंगाबाद : या शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. मागील काही वर्षांपासून हा वारसा हळूहळू नष्ट होत चालला आहे. येणाऱ्या पिढीला हा इतिहास कळायला हवा. त्यासाठी ऐतिहासिक वास्तूंचा सांभाळ करण्याची जबाबदारी तरुणाईवर असल्याचे मत इतिहासकार डॉ. दुलारी कुरैशी यांनी व्यक्त केले.
जागतिक नदी दिनानिमित्त खाम नदीच्या ‘स्ट्रक्चरल मजेस्टी’ या विषयावर शनिवारी लोखंडी पूल येथे डॉ. कुरैशी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी सांगितले की, मलिक अंबर, औरंगजेबनंतर निजाम काळात खाम नदी आणि त्यावरील पाण्याच्या स्रोतावर पाणचक्की, किलेअर्क, बीबी का मकबरा उभे आहेत. शंभरापेक्षा जास्त खोल्या असलेला औरंगजेबचा महाल म्हणजे किलेअर्क होय. या वास्तूंमध्ये सुंदर फुलांची झाडे होती. शहरात सुंदर तलाव आणि अनेक हौद आहेत. सलीम अली सरोवर, हर्सूल तलाव, जसवंतपुरा येथील जसवंत सरोवर, कमल तलाव आणि मलिक अंबरने बनवलेला खिजरी सरोवर सामील आहेत. या सर्वांचा सांभाळ अत्यंत चांगल्या पद्धतीने होणे गरजेचे आहे. यावेळी सहायक आयुक्त नंदकिशोर भोंबे, कार्यकारी अभियंता ए.बी. देशमुख, स्मार्ट सिटीचे आदित्य तिवारी, अर्पिता शरद, इको सत्त्वच्या नताशा झरीन आणि गौरी मिराशी यांची उपस्थिती होती.