जमत नसेल तर आमच्या स्टेजवर येऊन बोला, अब्दुल सत्तारांनी आदित्य ठाकरेंना पुन्हा डिवचले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 08:08 PM2022-11-04T20:08:21+5:302022-11-04T20:09:37+5:30
छोटा पप्पू म्हणून उल्लेख केल्यानंतर अबदुल सत्तार यांना थेट उत्तर देण्यासाठी आदित्य ठाकरे सिल्लोडमध्ये सभा घेणार आहेत
सिल्लोड (औरंगाबाद) : कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आदित्य ठाकरे यांच्या सभेची जागा बदलण्याचे प्रशासनाने सांगितले आहे. सभा घेण्यासाठी हिम्मत लागते. त्यांना जमत नसेल तर आमच्या सभेत खा. श्रीकांत शिंदे यांचे भाषण झाल्यानंतर स्टेजवर येऊन बोलावे, असा टोला लगावत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांना पुन्हा एकदा डिवचले.
गेल्या काही दिवसांपासून मंत्री अब्दुल सत्तार आणि आदित्य ठाकरे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. दरम्यान छोटा पप्पू म्हणून सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख केला होता. सत्तार यांच्या आरोपाला थेट उत्तर देण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी ७ नोव्हेंबरला सिल्लोडमध्ये सभा घेण्याची घोषणा केली. आदित्य यांनी सभेची घोषणा करताच अब्दुल सत्तार यांनी त्याच दिवशी सिल्लोडमध्ये खा. श्रीकांत शिंदे यांच्या सभेचे आयोजन केले. दरम्यान, आज आदित्य ठाकरे यांच्या महावीर चौकातील सभेस पोलिसांनी परवानगी नाकारली. काही वेळाने ठाकरे यांच्या सभेस जळगाव - औरंगाबाद रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या शेजारील मैदानात सभेस पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली. मात्र, यामुळे राजकारण राजकारण चांगलेच तापले आहे. आदित्य ठाकरे विरुद्ध अब्दुल सत्तार यांच्यातील सामन्यात आता सोमवारी सिल्लोड येथील सभेत कोण वरचढ ठरते याची चर्चा सुरु झाली आहे.
तर आमच्या स्टेजवर या, भाषण द्या
सभा घेण्यास हिम्मत लागते. सभेस परवानगी मिळाली आहे. आता ही सभा घेता येत नसेल तर आमच्या मंचावर यावे, आमचा स्टेज, माईक, पब्लिक वापरून खा. श्रीकांत शिंदे यांच्या भाषणानंतर काय बोलायचे ते बोलावे असे थेट आव्हान कृषिमंत्री सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांना दिले आहे. तसेच सिल्लोड सोयगाव तालुक्यात पब्लिक माझ्या सोबत आहे. आदित्य ठाकरे यांची सभा झालीच पाहिजे म्हणजे दुधका दूध आणि पाणी का पाणी होईल, असेही मंत्री सत्तार म्हणाले.