पोलिसांची मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करणे पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:04 AM2021-05-20T04:04:51+5:302021-05-20T04:04:51+5:30
औरंगाबाद: कर्ज वसुलीसाठी महिलेसोबत अरेरावी केल्यामुळे पोलिसांनी बॅंकेच्या रिकव्हरी एजंटला ठाण्यात नेल्याचे समजताच त्याच्या पाठोपाठ ठाण्यात जाऊन पोलिसांची रेकॉर्डिंग ...
औरंगाबाद: कर्ज वसुलीसाठी महिलेसोबत अरेरावी केल्यामुळे पोलिसांनी बॅंकेच्या रिकव्हरी एजंटला ठाण्यात नेल्याचे समजताच त्याच्या पाठोपाठ ठाण्यात जाऊन पोलिसांची रेकॉर्डिंग करणे तीन जणांना चांगलेच महागात पडले. पोलिसांनी त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंदविला.
१२ मे रोजी सायंकाळी आनंदनगर येथील एका कर्जदाराच्या घरी बॅंकेचा वसुली प्रतिनिधी सचिन श्रीहरी गणगे गेले होते. तेव्हा कर्जदाराची पत्नी घरी होती. कर्जाचे हप्ते फेडण्यावरून त्यांच्यात वाद झाला. ही बाब समजताच पोलिसांनी तेथे जाऊन सचिनला ठाण्यात नेले. यानंतर त्याचे सहकारी साईराज विश्वनाथ लोंढे, आनंद किशोर काळबांड्व आणि गणेश रामराव वाघ हे ठाण्यात गेले. त्यांनी अचानक मोबाईलमध्ये पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार कक्षात बसलेल्या हवालदार विष्णू मुंढे आणि अन्य अधिकारी यांचा संवाद रेकॉर्डिंग करण्यास सुरुवात केली. ही बाब समजल्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि इतरांनी त्यांना याविषयी समज दिली. याप्रकरणी हवालदार विष्णू मुंढे यांनी त्यांच्याविरूध्द अदखलपात्र गुन्ह्याची तक्रार नोंदविली.