डिक्कीत पैसे ठेवणे पडले महागात, ऊसतोड टोळी मुकादमाचे अडीच लाख पळविले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 07:30 PM2022-09-05T19:30:46+5:302022-09-05T19:31:06+5:30
पिशोर नाक्यावरील एचडीएफसी बँकेतून अडीच लाख रुपये काढून डिक्कीत ठेवले
कन्नड (औरंगाबाद) : बँकेतून काढलेले पैसे पिशवीत ठेवून मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवणे ऊसतोड टोळी मुकादमास महागात पडले आहे. बस स्टॅण्ड समोर गाडी उभीकरून लघुशंकेसाठी जाऊन येण्याच्या वेळेत चोरट्यांनी डिक्की उघडून पैशांची पिशवी पळविल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली आहे.
दशरथ राठोड व त्यांचा मुलगा नारायण राठोड ( रा. भांबरवाडी ) हे उसतोड टोळी मुकादम आहेत. आज दुपारी नारायण राठोड याने शहरातील पिशोर नाक्यावरील एचडीएफसी बँकेतून अडीच लाख रुपये काढले. पासबुक तसेच रकमेसह पिशवी वडील दशरथ राठोड यांच्याकडे दिले. त्यांनी ती पिशवी मोटार सायकलच्या डिक्कीत ठेवली. सातकुंड येथील बाबू चव्हाण हेही त्यांच्या सोबत होते. तेथून बसस्टॅण्ड समोरील ओळखीच्या टेलरच्या दुकानासमोर मोटार सायकल उभी केली. बाबू चव्हाण हे दुकानात गेले तर दशरथ राठोड हे लघुशंकेसाठी बसस्थानकात गेले. परत आल्यानंतर राठोड आणि चव्हाण घराकडे जाण्यासाठी निघाले.
दरम्यान, पंचायत समिती कार्यालयाजवळील दुकानावर खरेदी केलेले सामान ठेवण्यासाठी डिक्की उघडली असता पैशांची पिशवी नसल्याचे त्यांचे लक्षात आले. त्यांनी लागलीच पोलीस ठाणे गाठले. पोउपनि भुषण सोनार व पोकॉ कुलकर्णी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि भुषण सोनार करीत आहेत.