अवघी पैठणनगरी भक्तिरसात न्हाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 12:21 AM2018-03-08T00:21:08+5:302018-03-08T00:21:36+5:30
नाथ महाराजांच्या या अभंगाप्रमाणे बुधवारी लाखो वारक-यांची नाथमहाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर अवस्था झाली.
संजय जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण :
धन्य आजि दिन संत दर्शनाचा।
अनंत जन्मीचा शीण गेला ।।
मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे ।
कदा न सोडावे चरण त्यांचे ।।
नाथ महाराजांच्या या अभंगाप्रमाणे बुधवारी लाखो वारक-यांची नाथमहाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर अवस्था झाली.
नाथ महाराजांच्या दर्शनाच्या ओढीने शेकडो किलोमीटरचे अंतर पायी कापत आलेल्या वारकºयांना आज समाधी दर्शनानंतर अलौकिक असे समाधान प्राप्त झाले. वारकºयांच्या उत्साहाने पैठणनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. मुखातून ‘भानदास-एकनाथां’चा जयघोष व समोरासमोर भेट होताच एकमेकांचा होणाºया चरण स्पर्शाच्या दृश्याने वारकरी संप्रदायाच्या महान परंपरेचा ठायीठायी अनुभव आज येत होता.
नाथषष्ठी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आज दिवसभर पैठण शहरात विविध मार्गाने दिंड्या दाखल होत होत्या. हातात भगवा ध्वज, गळ्यात तुळशीमाळा तर महिला वारकºयांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन, मुखात ‘भानदास -एकनाथां’चा जयघोष, हाताने टाळ मृदंगाचा गजर करत शहराच्या रस्त्यावरून निघालेल्या दिंड्या, सोबत सजवलेल्या पालख्या पुढे अश्वाची रुबाबदार स्वारी, जिकडे पाहावे तिकडे वारकरी आणि हरिनामाचा गजर दुसरे काहीच नाही, असे पैठणनगरीचे आजचे चित्र होते. अवघी पैठणनगरी नाथभक्तीत लीन झाली होती.
पैठण शहरात विसावलेल्या शेकडो दिंड्यांतून दिंडीप्रमुख फडप्रमुख व ह.भ.प. महाराजांनी आपापल्या फडावर कीर्तन, प्रवचन करून गुरू -शिष्य परंपरेनुसार मार्गदर्शन केले.
अभंगाच्या तालावर मानाच्या निर्याण दिंडीचे मार्गक्रमण
दुपारी गावातील नाथ मंदिरातून नाथवंशज व मानकºयांची मानाची निर्याण दिंडी पारंपरिक अभंग म्हणून काढण्यात आली. या दिंडीच्या अग्रभागी सजवलेला रुबाबदार अश्व, त्यानंतर जरी पटका, भानदास महाराजांचे निशाण, झेंडेकरी, त्यानंतर दिंडी विणेकरी, अमृतराय संस्थानची छत्री, नाथवंशजांच्या छत्र्या, संस्थानिक अमळनेरकर महाराजांची दिंडी, भगवानगडाची दिंडी व सर्वात शेवटी वारकरी अशा क्रमाने अभंगाच्या तालावर मार्गक्रमण करण्यात येत होते.
नाथवंशजांच्या दिंडीचे परंपरेनुसार आज वाळवंटात नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी स्वागत केले. नाथवंशजांच्या दिंडीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी-भाविक दिंडी मार्गावर स्थिरावले होते.
पैठणकरांचा नाथषष्ठीत सेवाभाव
लाखो वारकरी आज शहरात दाखल झालेले असताना या वारकºयांना आपले पाहुणे आहेत, अशा पद्धतीने पैठणकरांनी धाऊन जात मदत केली. वारकºयांना पाणी, नाश्ता, जेवण, चहा, फराळ आदींचे विविध स्टॉल लावून आपल्या परीने सेवा देण्याचा प्रयत्न पैठणकरांचा दिवसभर सुरू होता.