मुलानेच दिली होती वडिलांची सुपारी; आई-भावडांना वाऱ्यावर सोडून तीन लग्न केल्याचा राग
By सुमित डोळे | Published: August 3, 2023 07:50 PM2023-08-03T19:50:53+5:302023-08-03T19:53:20+5:30
हनुमान नगरात घरात घुसून गोळीबार प्रकरणाचा उलगडा
छत्रपती संभाजीनगर : लहाणपणी वडिलांनी आई आणि भावडांना सोडून देत नंतर तीन संसार बसवले. त्यानंतर ना खर्चासाठी पैसे दिले ना कधी संपर्क केला. मनपातून सेवानिवृत्त झाल्यानंतरही मिळालेल्या आर्थिक लाभातून कुठलीही मदत केली नाही. वडिलांच्या या रागातूनच हनुमान नगरमध्ये प्रभू आनंद अहिरे (६१) यांच्यावर त्यांच्या पहिल्या पत्नीच्या मुलाने गोळीबार करवला.
गुन्हेगारांना दिड लाखांची सुपारी ठरवून ५५ हजार आगाऊ रक्कम देत त्याने हा प्रकार केला. महादु आहिरे (३२, रा. कन्नड) असे त्याचे नाव असून सचिन भास्कर अंभोरे (२४, ता. कन्नड) व नंदकिशोर परसराम अंभोरे-देशमुख (२६, रा. चिखली, बुलढाणा) असे सुपारी घेतलेल्या गुन्हेगारांचे नाव आहे. पोलिसांचे पाच पथकांनी सलग तीन दिवस तपास करुन या घटनेचा उलगडा केला.
अहिरे यांच्यावर ३१ जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता अज्ञातांनी घरात घुसून गोळीबार केला. यात ते थोडक्यात बचावले. मनपात सफाई कामगार राहिलेल्या अहिरे यांच्यावर भरदिवसा गोळीबार करुन कोणी का मारेल, असा प्रश्न पोलिसांसमोर पडला. पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी पुंडलिकनगर पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासासाठी सुचना केल्या. अहिरे यांच्यासह त्यांच्यापुर्वी त्या घरात भाडेतत्वावर राहणाऱ्या तीन कुटूंबाची चौकशी सुरू झाली. दुसरीकडे सातत्याने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास, जबाब सुरू होते. मंगळवारी अहिरे याच्याच चौकशीत त्याच्या तीन पत्नी, दहा पेक्षा अधिक मुलांविषयी माहिती मिळाली.
पहिल्या पत्नीचा संपर्कही नसल्याचे समोर आल्यावर पोलिसांचा तपास त्या दिशेने फिरला. बुधवारी त्यांनी महादुला ताब्यात घेतले आणि सर्व घटनेचा उलगडा झाला. उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एसीपी रणजित पाटील, धनंजय पाटील, निरीक्षक कैलास देशमाने, राजश्री आडे, एपीआय सुधिर वाघ, मनोज शिंदे, काशिनाथ महांडुळे, अमोल म्हस्के, प्रविण वाघ, पुंडलिकनगरचे एपीआय शेषराव खटाणे, विठ्ठल घोडके, संदिप काळे, दिपक देशमुख, जालिंधर मांटे, संतोष पारधे, गणेश डाेईफोडे, कल्याण निकम, अजय कांबळे, संदिप बीडकर, दिपक जाधव यांनी कारवाई पार पाडली.