महामार्गावर ‘काळ ’ बसला होता टपून...

By Admin | Published: June 12, 2014 11:40 PM2014-06-12T23:40:19+5:302014-06-13T00:33:20+5:30

शिरीष शिंदे , बीड शहरापासून नजीक असलेल्या नामलगाव फाट्याजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर जीप धडकून आठजण ठार झाल्याची दुदैवी घटना गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास घडली.

It was the 'time' on the highway | महामार्गावर ‘काळ ’ बसला होता टपून...

महामार्गावर ‘काळ ’ बसला होता टपून...

googlenewsNext

शिरीष शिंदे , बीड
शहरापासून नजीक असलेल्या नामलगाव फाट्याजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर जीप धडकून आठजण ठार झाल्याची दुदैवी घटना गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. रस्त्यावर उभा असलेल्या ट्रकचे स्टेअरींग लॉक झाल्यामुळे तो जागेवरच उभा होता, रस्त्याच्या खाली सदरील ट्रक बाजुला घेता आला नाही. जणू तो ट्रक त्यांच्या मृत्यूची वाट पहातच उभा होता.
अंबाजोगाई येथील सय्यद कुटूंबीय त्यांच्या मुलास औरंगाबाद येथील हर्सुल जेलमध्ये भेटण्यासाठी मोठ्या उत्साहाने निघाले होते. सकाळी चारच्या सुमारास सय्यद कुटुंबियातील आठ मोठ्या व्यक्ती व दोन मुली निघाल्या होत्या. दरम्यान, जालना जिल्ह्याकडे ट्रकमध्ये सिमेंटच्या गोण्या घेऊन चालला असताना नामलगाव फाट्यानजीक असलेल्या पेंडगाव शिवार परिसरात सदरील ट्रकचे टायर फुटले. ट्रकमध्ये सिमेंटच्या गोण्या असल्याने हा ट्रक ओव्हर लोड होता. त्यात पावर स्टेअरींग असल्याने ट्रकचे स्टेअरींग लॉक झाले होते. सय्यद कुटूंबियांची जीप बीड शहरातून बाहेर पडल्यानंतर पेंडगाव शिवार परिसरात येताच सदरील ट्रकवर वेगाने जाऊन धडकली. यात आठ ठार झाले. स्टेअरींग लॉक झाले नसते तर कदाचीत ट्रक बाजुला घेता आला असता. मात्र नियतीलाही हे मंजूर नव्हते. या अपघातात सय्यद कुटूंबियांना प्राण गमवावा लागला. जीपची गती कमी असती तर कदाचीत अपघात टळू शकला असता.
या संदर्भात प्रतिक्रीया देताना वाहतुक शाखेचे पोलिस निरिक्षक एम.ए. सय्यद म्हणाले की, ट्रकमध्ये सिमेंटची पोते असल्यामुळे सदरील ट्रक रस्त्याच्या बाजुला घेणे चालकास शक्य झाले नाही, असे तपासात समोर आले आहे. तसेच ही ट्रक पावर स्टेअरींगची असल्याने स्टेअरींग लॉक झाले होते. या प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून चालकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. रत्यावरुन जाताना गाडीचे चाक पंचर किंवा फुटले तर चालकाने तात्काळ वाहन रस्त्याच्या खाली घ्यावे कारण मागच्या बाजुने येणारी वाहने वेगात येत असतात. समोर उभे असलेले वाहन पाहून ड्रायव्हर गोंधळून जाण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे चालकांनी वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये तसेच अपघात टाळले जावेत यासाठी चालकांनी नेहमीच सतर्कता घेणे उचित ठरते. दरम्यान, अपघात झाल्यानंतर पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उप-अधीक्षक अभय डोंगर यांच्यासह पोनि चव्हाण, नाईकवाडी, वाहतुक पोलिस निरिक्षक एम.ए. सय्यद तेथे दाखल झाले. वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडी सुरळीत केली.
काळजी घेणे गरजेचे
धुळे-सोलापूर महामार्ग बीड शहरातून गेला असल्याने गेवराई रोडवर अपघात होण्याची संख्या अधिक आहे. या महामार्गावरुन दिवसा व रात्री मोठी वाहनांची ये-जा नेहमीच असते. त्यामुळे मोठ्या वाहनांच्या धडकेमुळे अपघात घडतात. वाहन चालकच अपघात होण्यास जबाबदार नसतात तर समोर येणारी वाहनेही अपघातास कारणीभुत ठरतात. वाहतुकीच्या नियमांचे पालन होत नसल्याने जिल्ह्यात अपघात होण्याची संख्या लक्षणीय आहे. निष्काळजीपणे वाहने चालविल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागते.
रात्री व पहाटेच्यावेळी अपघात होण्याची संख्या अधिक आहे. बीड शहरात मोठ्या वाहनाच्या धडकेमुळे दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे शहरात विविध ठिकाणी गतीरोधक बसविण्यात आली आहेत. यामुळे अपघात होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. अपघात रोखण्यासाठी सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
भेट अधुरीच राहिली ...
अविनाश मुडेगावकर ल्ल अंबाजोगाई
हर्सुल कारागृहात खूनाच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आपल्या मुलाला भेटण्यासाठी कुटुंबिय औरंगाबादला निघाले होते. परंतु रस्त्यातच काळाने या कुटुंबावर घाला घातला आणि त्यांची भेट अधुरीच राहिली. बीड-औरंगाबाद महामार्गावर गुरूवारी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान जीप आणि ट्रकच्या अपघातात अंबाजोगाईच्या एकाच कुटुंबातील आठ जणांचा बळी गेला.
येथील रविवार पेठ परिसरात राहणारे सय्यद सलीम सय्यद अब्बास यांच्या कुटुंबातील सदस्य व नातेवाईक गुरुवारी सकाळी औरंगाबाद कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला त्यांचा मुलगा सय्यद जावेद सय्यद सलीम याच्या भेटीसाठी औरंगाबाद येथील कारागृहात जाण्यासाठी जीपमधून अंबाजोगाई व औरंगाबादकडे निघाले होते. रस्त्यातच झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी शहरात धडकली व संपूर्ण शहरावर शोककळा पसरली. सय्यद जावेद सय्यद सलीम याला येथील मंगळवार पेठ भागातील बांधकाम मिस्त्री राम मासाळ यांच्या खून प्रकरणी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी २४ डिसेंबर २०१३ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ही जन्मठेपेची शिक्षा औरंगाबाद येथील कारागृहात तो भोगत आहे. सय्यद जावेद याला भेटण्यासाठी त्याचे कुटुंबिय व नातेवाईक गुरुवारी सकाळी पहाटे चार वाजता जीपने अंबाजोगाई येथून औरंगाबादकडे निघाले होते. जावेद याला कारागृहात भेटण्यासाठी सकाळी नऊची वेळ दिलेली असल्याने कुटुंबियांनी घरून लवकर निघण्याची घाई केली. नऊ वाजण्यापूर्वी आपल्याला तिथे पोहोचले पाहिजे तरच मुलाची भेट होईल, या हेतूने ते घाईघाईने औरंगाबादकडे निघाले होते.
अपघाती निधनाने अंबाजोगाईत हळहळ
सय्यद यांच्या कुटुंबातील आठ जणांचा अपघातात मृत्यू झाल्याची वार्ता सकाळी अंबाजोगाई शहरात धडकली अन् अंबाजोगाई शहरात दु:खाचे वातावरण निर्माण झाले. या आठजणांच्या निधनामुळे शहर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दुपारी दोन वाजल्यानंतर अपघातातील मृतांचे पार्थिव अंबाजोगाई शहरात आणल्यानंतर रविवार पेठ परिसर मोठ्या आक्रोशाने सुन्न झाला. गुरुवारी सायंकाळी या आठजणांची अंत्यविधीसाठी शहरवासियांची अलोट गर्दी झाली होती.

Web Title: It was the 'time' on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.