मुहूर्त ठरला! राज्यपालांच्या प्रमुख उपस्थिती २७ जूनला होणार विद्यापीठाचा ६३ वा दीक्षांत सोहळा
By विजय सरवदे | Published: May 29, 2023 07:33 PM2023-05-29T19:33:03+5:302023-05-29T19:33:22+5:30
कुलपती रमेश बैस, भारतीय विद्यापीठ संघाच्या महासचिव डॉ. पंकज मित्तल यांची प्रमुख उपस्थिती राहणार
छत्रपती संभाजीनगर : राज्यपाल कार्यालयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६३ व्या दीक्षांत सोहळ्याची तारीख २७ जून ही निश्चित केली असून, या सोहळ्यास स्वत: राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस, तसेच भारतीय विद्यापीठ संघाच्या (असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज) महासचिव डॉ. पंकज मित्तल या उपस्थित राहणार आहेत.
राज्यपाल कार्यालयाकडून दीक्षांत समारंभाच्या तारखेवर शिक्कामोर्तब झाल्यामुळे विद्यापीठाने सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाच्या सोहळ्याच्या नियोजनाला गती दिली आहे. या सोहळ्यामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ व मार्च-एप्रिल २०२२ या परीक्षांत उत्तीर्ण पदवीधारकांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय १९ नोव्हेंबर २०२२ ते आजपर्यंत पीएच.डी. मिळालेल्या संशोधकांना या समारंभात पदवी प्रदान करण्यात येणार आहे.
अलिकडेच १५ मे रोजी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी कुलपती रमेश बैस यांची भेट घेऊन त्यांना दीक्षांत सोहळ्याचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर आता राजभवनाकडून २७ जून ही तारीख निश्चित करण्यात आली.
या सोहळ्यास ‘असोशिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज’ च्या महासचिव डॉ. पंकज मित्तल या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. २७ जून रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठ नाट्यगृहात हा सोहळा होणार असून विद्यापीठाने जय्यत तयारी सुरू केली आहे. यासाठी २० समित्या स्थापन करण्यात येणार आहेत.
सलग पाचवा दीक्षांत समारंभ
कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या कार्यकाळातील हा सलग पाचवा दीक्षांत समारंभ असणार आहे. डॉ. येवले यांनी १६ जुलै २०१९ रोजी कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारली. सन २०२० मध्ये हिरक महोत्सवी सोहळा झाला. सन २०२१ मध्ये ‘ऑनलाइन’पद्धतीने हा समारंभ झाला. मागील वर्षी १८ नोव्हेंबर रोजी नितीन गडकरी व ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ‘डी.लिट.’ने सन्मानित करण्यात आले.
मानव्य विद्याचे सर्वाधिक संशोधक
गेल्या वर्षात झालेल्या दीक्षांत समारंभापासून अर्थात १८ नोव्हेंबर २०२२ ते आजपर्यंत एकूण २९१ संशोधकांनी पीएच. डी. प्राप्त केली. त्यात सर्वाधिक मानव्य विद्या शाखेतील १२१ संशोधक असून विज्ञान-तंत्रज्ञान -९१, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र ४५ तर, आंतरविद्या शाखेत ३४ जणांनी पीएच.डी. प्राप्त केली.