'जीव गेला तरी चालेल; परंतु नियम मोडणारच'; वाहनधारकांचे पोलिसांशी भांडणे सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 07:17 PM2019-05-31T19:17:48+5:302019-05-31T19:24:48+5:30
ई- चलन आले तरीही वाहन धारक सुसाट
औरंगाबाद : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून हुज्जत घालून कामात अडथळा निर्माण केला जातो. अनेकदा धक्काबुक्कीचे प्रसंग ओढावल्याच्या प्रकारात घट होण्याऐवजी त्यात वाढच होत आहे.
मोबाईल किंवा व्हॉटस्अॅपवर दुचाकीस्वाराचा फोटो काढून तो आॅनलाईन पावतीसाठी टाकणे हा योग्य पर्याय आहे. रोख व्यवहारात पोलीस कर्मचारी अपहार करतात, असा नागरिकांतही गैरसमज झाला आहे. त्यामुळे ई-चालान दंड भरणे आवश्यक आहे. वाहतूक नियमांचे पालन केल्यास तुम्हाला पोलीस हटकणार नाही, असे वाहतूक शाखेच्या पोलिसांचे म्हणणे आहे. नियम मोडणार आणि पोलिसांना पाहून न पाहिल्यागत करीत सुसाट वाहनावरून पळून जाणे हे नियमाविरुद्ध आहे. जीवन मौल्यवान आहे, धावत्या वाहनावर फोन वापरू नका, वाहतूक नियमांचे पालन करा, रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून द्या, असे समुपदेशन अनेकदा केले आहे. नियम मोडणाऱ्यांना पोलीस चौकीत किंवा ठाण्यात दिवसभर बसवून त्यांना किरकोळ दंड लावून सोडून दिल्याचे प्रकारही घडले आहेत; परंतु वाहतुकीचे नियम मोडण्यात अद्याप कुणी माघार घेतलेली नाही, तर फ्री स्टाईल हाणामारीपर्यंत अनेकदा प्रकरणे गेली आहेत.
५ मे रोजी जळगाव रोडवर दुचाकीस्वार युवकाने नियम मोडला. त्याने आॅनलाईन चालान पाठविण्याची मागणी केली. चावी काढू नका मला अर्जंट काम आहे, असा आग्रह धरला, त्यासही पोलिसांकडून मारहाण झाल्याची घटना समोर आली. वाहन चालविताना फोनवर बोलणाऱ्याला हटकले म्हणून वाहन चालविणाऱ्या दोघांनी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करून ई-चालान मशीन हिसकावण्याचा प्रकार घडला. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसात ते आठच्या सुमारास गुलमंडीत घडली. वाहन पार्किंगच्या विषयावरून मारहाणीचा प्रकार गत दोन महिन्यांपूर्वी आमदार कार्यालयासमोर पुंडलिकनगर परिसरात घडला होता. सिल्लेखाना येथेही मारहाणीचा प्रकार घडला होता. ई-चालान द्या भांडणे होणार नाहीत, असा आग्रह जनसामान्यातून होत असून, वाहन अडवून त्याची चावी काढून घेणे, हा प्रकार वाहतूक कर्मचाऱ्यांनी टाळायला हवा. आॅनलाईन दंड, ई-चालानचा वापर करा,असे त्रस्त वाहनचालकांचे म्हणणे आहे.
कायदा तोडला तर गुन्हे दाखल होणारच
वाहतूक शाखेचे प्रभारी सहायक पोलीस आयुक्त भारत काकडे म्हणाले की, कुणीही कायदा हातात घेऊ नये. चूक केल्यास गुन्हे दाखल होणारच. अपघात होऊ नये म्हणून नागरिकांनीच मानसिकता बदलावी.