गाडी रुळावर येण्यास वेळ लागणार; नवनियुक्त आयुक्त निपुण विनायक यांनी केला कामाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 07:58 PM2018-05-17T19:58:48+5:302018-05-17T19:58:56+5:30

महापालिकेची गाडी रुळावर येण्यासाठी थोडा वेळ निश्चितच लागणार असल्याचे मत नवनियुक्त आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी व्यक्त केले.

It will take time to get on the train track; Newly appointed commissioner Nipuna Vinayak started work | गाडी रुळावर येण्यास वेळ लागणार; नवनियुक्त आयुक्त निपुण विनायक यांनी केला कामाला प्रारंभ

गाडी रुळावर येण्यास वेळ लागणार; नवनियुक्त आयुक्त निपुण विनायक यांनी केला कामाला प्रारंभ

googlenewsNext

औरंगाबाद : उंचीवर गेल्यानंतर मला भीती वाटत होती. ही भीती घालविण्यासाठी मी पॅराग्लाइडिंग करायला लागलो. औरंगाबाद महापालिका आयुक्त म्हणून काम करण्याचे आव्हानही असेच मोठे आहे. एका दिवसात महापालिकेचे चित्र बदलणार नाही. नागरिकांमध्ये मनपाबद्दल विश्वास निर्माण करणे, प्राधान्यक्रमाने कचरा, पाणी या प्रश्नांचा निपटारा करणे आवश्यक आहे. महापालिकेची गाडी रुळावर येण्यासाठी थोडा वेळ निश्चितच लागणार असल्याचे मत नवनियुक्त आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी व्यक्त केले.

मंगळवारी सायंकाळी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच बुधवारी सकाळी ८ वाजेपासून त्यांनी कामकाजाला सुरुवात केली. सायंकाळी पत्रकारांसोबत मनमोकळेपणे गप्पा मारताना त्यांनी नमूद केले की, चंदीगड हे माझे मूळ गाव, एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यावर २००१ मध्ये भारतीय प्रशासन सेवेत दाखल झालो. दिल्लीत मागील पाच वर्षांपासून काम करीत होतो. त्यापूर्वी मराठवाड्यात नांदेड महापालिका, जालना येथेही काम केले आहे. औरंगाबाद महापालिकेचा मी सध्या बारकाईने अभ्यास करतोय. साधारण आठ ते दहा दिवसांचा अवधी लागेल. आजच वॉर्ड अधिकाऱ्यांसोबत बसून आढावा घेतला. कोणत्याही कामासाठी नागरिकांना महापालिकेत येण्याची गरज नाही. वॉर्ड अधिकाऱ्यांनी स्वत: आयुक्त म्हणून काम करावे, अशा सूचना दिल्या आहेत.

महापालिकेत आव्हाने खूप आहेत. प्रशासनाला स्वत:मध्ये व्यावसायिकपणा आणावा लागेल. अधिकाऱ्यांची टीम तयारी करावी लागणार आहे. प्रत्येक समस्येसाठी त्या क्षेत्रातील तज्ज्ञ, उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांसोबत पार्टनरशिप करावी लागेल. लोकसहभाग वाढणेही तेवढेच महत्त्वाचे वाटते. नागरिक चांगल्या कामासाठी एक पाऊल पुढे आल्यास महापालिका प्रशासन नऊ पावले पुढे जाईल. लोकांना सांगण्यापेक्षा स्वत: आधी करून दाखविण्यावर आपला अधिक विश्वास आहे. शहराची बलस्थाने कोणती हे लक्षात घेऊन काम करण्यात येईल. कचऱ्याचे शहर ही प्रतिमा पुसून काढण्यात येईल. प्रशासन आणि नागरिक, अशी एक चेन तयार करण्यात येणार आहे.

‘ओल्ड चार्म अ‍ॅण्ड ब्युटी’
५२ दरवाजांचे हे शहर आहे. पर्यटन क्षेत्रात काम करण्याची बरीच संधी आहे. शहराला गतवैभव मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे निपुण विनायक यांनी सांगितले. शहर कसे स्वच्छ व सुंदर करायचे हे ठरविण्याचा अधिकारही नागरिकांनाच देण्यात येणार आहे. श्वानांची नसबंदी, ई-गव्हर्नन्स, एक खिडकी योजना आदी अनेक क्षेत्रांत काम करण्यात येईल.

पाण्याचे आॅडिट करणार
शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पाण्याचे आॅडिट झालेले नाही. प्राधान्याने आॅडिट करण्यात येणार आहे. लिकेज खूप आहेत. अनधिकृत नळही खूप आहेत. मनपाचे उत्पन्न आणि खर्च याकडेही कटाक्षाने लक्ष देण्याची गरज असून, निधी कुठे वापरावा हेसुद्धा ठरविले जाणार आहे. मालमत्तांचे मूल्यांकन झालेले नाही.

Web Title: It will take time to get on the train track; Newly appointed commissioner Nipuna Vinayak started work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.