विजेचे खांब आड आले तरी चालेल, रस्ता बांधा; पीडब्ल्यूडी, महावितरणचा नाही ताळमेळ
By विकास राऊत | Published: October 5, 2023 07:44 PM2023-10-05T19:44:56+5:302023-10-05T19:46:14+5:30
महावितरणचे खांब रस्त्याच्या मधाेमध ठेवून दोन्ही बाजूंनी काँक्रिटीकरण उरकण्याचा अजब सल्ला बांधकाम विभागाने कंत्राटदाराला दिला.
छत्रपती संभाजीनगर : पश्चिम मतदारसंघाचे आ. संजय शिरसाट यांच्या मतदारसंघातील शरणापूर ते साजापूर- करोडीकडे जाणाऱ्या सहा कि.मी. रस्त्याला दशकापासून लागलेली घरघर मे २०२३ मध्ये सुटली. आठ वर्षांत तीनदा निधी देऊनही रस्त्याचे काम सुरू होण्यास मुहूर्त लागत नव्हता. अनेक राजकीय शुक्लकाष्ठातून सुटल्यानंतर काम सुरू झाले, मात्र त्या कामाचाही बट्ट्याबोळ सा.बां. विभाग आणि महावितरणने केला.
महावितरणचे खांब रस्त्याच्या मधाेमध ठेवून दोन्ही बाजूंनी काँक्रिटीकरण उरकण्याचा अजब सल्ला बांधकाम विभागाने कंत्राटदाराला दिला. कंत्राटदारानेही मागचा-पुढचा काहीही विचार न करता कामाचा धडाका लावला आहे. कंत्राटदाराच्या यंत्रणेला बसून ठेवल्यास नुकसान होऊ नये, म्हणून बांधकाम विभागाने काम पूर्ण करून घेण्याचे आदेश दिले तर महावितरण कंपनीने खांब काढण्याची जबाबदारी बांधकाम विभागाचीच आहे, असे सांगून हात वर केले. या टोलवाटोलवीत खांब कोण काढणार हे अनुत्तरित आहे.
...तर २८ कोटी जातील खड्ड्यात
५० फूट रस्ता सिमेंट- काँक्रिटीकरणातून होत आहे. रस्त्यात येणारे महावितरणचे ३० हून अधिक खांब न काढताच दोन्ही बाजूंनी काँक्रिटीकरण उरकण्यात येत आहे. महावितरण खांब काढेल, तेव्हा खड्डा खोदून काढेल. तेव्हा रस्त्याची पूर्ण चाळणी होईल. २८ कोटींच्या या रस्त्यात येणारे खांब बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी काढून देण्यासाठी प्रयत्न न केल्यामुळे हा प्रकार घडत आहे. चौपदरी रस्ता असताना विजेच्या खांबांमुळे एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे.
सहा कोटींवरून २८ कोटींवर गेले काम...
२०१५ साली फक्त सहा कोटींमध्ये या रस्त्याचे काम झाले असते; परंतु, त्यावेळी काम रखडले. २०२१ साली भूमिपूजन झालेल्या कामांमध्ये या रस्त्याचा समावेश होता. के.ए. कन्स्ट्रक्शनने चार पूल बांधून १५ कोटींचे काम अर्धवट सोडल्याने बांधकाम विभागाने निविदा रद्द केली. २०२२ मध्ये नव्याने २८ कोटींवर रस्त्याचे काम गेले. मुंबईतील जे.पी. कन्स्ट्रक्शन्सने रस्त्याचे काम घेतले असून प्रकाश पाटील उपकंत्राटदार आहेत.
पीडब्ल्यूडी आणि महावितरणचा एकमेकांवर निशाणा...
पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांना थेट प्रश्न...
प्रश्न : रस्त्यातील खांब न काढता काम का सुरू आहे?
उत्तर : महावितरणला १५ वेळेस पत्र देऊनही त्यांनी काही केले नाही.
प्रश्न : महावितरणने रस्ता खोदून खांब काढले तर काय?
उत्तर : खालपर्यंत काँक्रीट केले आहे, खांब कापून काढावे लागतील.
प्रश्न : या सगळ्या प्रकाराला कोण जबाबदार?
उत्तर : महावितरण.
महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रवीण पवार यांना थेट प्रश्न
प्रश्न : महावितरण रस्त्यातील खांब का काढत नाही?
उत्तर : ते खांब पीडब्ल्यूडीने कंत्राटदार नेमून काढावेत.
प्रश्न : महावितरणची यात काय भूमिका?
उत्तर : कामाच्या बजेटमध्ये १० टक्के तरतूद असून पीडब्ल्यूडीने कंत्राटदार नेमावा.
प्रश्न : खांब न काढल्यास काय होणार?
उत्तर : अपघात होतील, काम सुरू होण्यापूर्वीच पीडब्ल्यूडीने हे खांब काढायला हवे होते.