औरंगाबादेत ‘आयटीआय’च्या ‘इलेक्ट्रिशिअन’ ट्रेडला सर्वाधिक पसंती; २१ जागेसाठी आले १२ हजार ३३१ प्रवेशअर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:26 PM2018-07-12T12:26:05+5:302018-07-12T12:28:44+5:30
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) वीजतंत्री (इलेक्ट्रिशिअन) ट्रेडकडे विद्यार्थ्यांचा प्रचंड ओढा असून अवघ्या २१ जागांसाठी १२ हजार ३३१ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली.
औरंगाबाद : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) वीजतंत्री (इलेक्ट्रिशिअन) ट्रेडकडे विद्यार्थ्यांचा प्रचंड ओढा असून अवघ्या २१ जागांसाठी १२ हजार ३३१ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली. प्रवेशाच्या पहिल्या फेरीमध्ये या ट्रेडची गुणवत्ता यादी ९४.५ टक्क्यांवर पोहोचली.
मराठवाड्यात आयटीआयची ८२ शासकीय आणि ३६ खाजगी महाविद्यालये आहेत. त्यात एकूण ५५ ट्रेड आहेत. मराठवाड्यातील शासकीय आणि खाजगी आयटीआयमध्ये यावर्षी प्रवेशासाठी १८ हजार १३९ जागा उपलब्ध आहेत. यासाठी तब्बल ५६ हजार १३९ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. या नोंदणीनंतर पहिली प्रवेश यादी मंगळवारी (दि.१०) जाहीर झाली. पहिल्या फेरीत १४ हजार २०२ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट देण्यात आल्याची माहिती विभागीय सहसंचालक डी.आर. शिंपले यांनी दिली. मराठवाड्यातील सर्वांत जुने आणि मोठे आयटीआय महाविद्यालय असलेल्या औरंगाबादेत प्रवेशासाठी सर्वाधिक स्पर्धा आहे. तारतंत्रीसाठी ८,११०, यांत्रिक डिझेल ७,३१४, यांत्रिक मोटारगाडी ४,४१८, जोडारी (वेल्डर) ६,९२४, कातारी २,८२२, यंत्र कारागीर ३,०२२, मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स ४,८२३ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. या सर्व ट्रेडला ५० पेक्षा कमी जागा उपलब्ध आहेत.
तात्काळ नोकरी मिळते
वीजतंत्री, तारतंत्री, यांत्रिक डिझेल, यांत्रिक मोटारगाडी, जोडारी (वेल्डर), कातारीसह इतर ट्रेडच्या प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांना तात्काळ नोकरी मिळते. यातून अनेकांना स्वत:चा व्यवसायही सुरू करता येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा दहावी झाल्यानंतर या अभ्यासक्रमाकडे सर्वाधिक ओढा असतो.
- सलीम शेख, उपप्राचार्य, शासकीय आयटीआय, औरंगाबाद