'..हा तर भारताचा खजिना'; ब्राझीलचा 'रॉकस्टार' गिलबर्टो गिलवर वेरूळ लेणीची भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 03:59 PM2019-09-23T15:59:15+5:302019-09-23T16:10:57+5:30
भारताची अतुलनीय संपत्ती असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
औरंगाबाद : ब्राझीलचे प्रख्यात संगीतकार, पॉपस्टार आणि राजकारणी गिलबर्टो गिल हे सध्या भारताच्या पर्यटनावर आले आहेत. सोमवारी त्यांनी जगप्रसिद्ध वेरूळ लेणीला भेट दिली. भेटीनंतर त्यांनी, लेणीतील कलाकृती अचंबित करणाऱ्या असून ही भारताची अतुलनीय संपत्ती असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
जगप्रसिद्ध वेरूळ लेणीच्या भेटीनंतर गिलबर्टो गिल यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. भारतीय संस्कृतीने भारावून गेलेल्या गिल यांनी वेरूळ लेणीतील कलाकृतीने आपण अत्यंत प्रभावित झालो असल्याचे सांगितले. या आधी लेणीबद्दल माहिती नसल्याची कबुली देत भारतीय पूर्वजांनी अत्यंत अद्वितीय अशी कलाकृती निर्माण केल्याचे म्हटले. भारतीय इतिहास आणि नागरीकरण हे खूप समृद्ध असल्याचे सांगत त्यांनी वेरूळ लेणीला प्रथमच भेट दिली असल्याचे सांगितले. या आधी त्यांनी भारतात केरळ येथे एका आश्रमाला भेट दिली असल्याचे सांगितले.
ब्राझील- भारत ऐतिहासिक संबंध
भारत आणि ब्राझील या दोन्ही देशात ऐतिहासिक संबंध आहेत. वसाहतवादाच्या काळात दोन्ही देशात पोर्तुगीजांच्या वसाहती होत्या. दोन्ही देशाची ऐतिहासिक नाळ जोडली गेली आहे. ब्राझिलियन नागरिकांना दिल्ली आणि राजस्थान संबंध अधिक माहिती आहे. यानंतर एकेकाळी पोर्तुगीजांची वसाहत असलेल्या गोवा येथे भेट देणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
पारंपारिक स्वागताने भारावून गेले
'किंग ऑफ पॉप' म्हणून जागतिक संगीत विश्वात प्रसिद्ध असलेले गिलबर्टो गिल हे सोमवारी सकाळी डेक्कन ओडिसी या आलिशान पर्यटन रेल्वेने शहरात दाखल झाले. यावेळी त्यांचे भारतीय परंपरेनुसार स्वागत करण्यात आले. यामुळे ते भारावून गेले होते. त्यांच्या सोबत इतर २२ पर्यटक होते. सर्व पर्यटक लागलीच वेरूळ लेणीच्या भेटीस रवाना झाले.
जागतिक संगीत,राजकारणावर प्रभाव
गिलबर्टो गिल जगप्रसिद्ध गायक आहेत. जागतिक स्तरावर त्यांनी अनेक पारितोषिके पटकावली आहेत. त्यांनी ब्राझिलचे संस्कृतीमंत्री पदही भूषविले आहे. संगीतासाठी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. गिलबर्टो गिल हे ब्राझीलच्या संगीताची खरी ओळख आहे, असे म्हटले जाते. रॉक, ब्राझिलियन लोकसंगीत, सांबा , आफ्रिकन संगीत आणि अनेक वाद्य वाजविण्यात त्यांचा हातखंडा आहे. यासोबतच ब्राझील आणि जागतिक राजकारणात त्यांची भूमिका महत्वाची मानली जाते. ते पर्यावरण चळवळीत सुद्धा सक्रीय आहेत.